Nashik Crime : रिमोटचे बटण दाबताच कारची नंबर प्लेट गायब, गुटखा तस्करीचा हायटेक फंडा पाहून पोलिसही चक्रावले.. कसा झाला भांडाफोड?

Gutkha Smuggling Nashik Crime : अवैध गुटखा तस्करीसाठी तस्करांकडून अनोखी शक्कल वापरली जात होती. रिमोटचे बटण दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर काळा पडदा यायचा. पोलिसांच्या हातावर तुरी दिली जायची.
Gutkha Smuggling Nashik Crime
Gutkha Smuggling Nashik Crimesarkarnama
Published on
Updated on

Nashik News : अवैध गुटखा तस्करीसाठी तस्करांकडून अत्याधुनिक आणि नवनवीन शक्कल लढविल्या जात असल्याचे आणखी एक उदाहरण नाशिक जिल्ह्यात समोर आले आहे. देवळा तालुक्यातील विठेवाडी येथे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने केली जाणारी हायटेक गुटखा तस्करी उघडकीस आली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या पद्धतीचा अवलंब करण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी देवळा पोलिसांनी कारवाई करत सुमारे १४ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच एका संशयिताला अटक करण्यात आली असून, या रॅकेटमधील मुख्य सराईत तस्कर मात्र पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वीच पसार झाला.

कारवाईदरम्यान संशयितांच्या मारुती सुझुकी इर्टिगा कारची झडती घेतल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. वाहनाच्या पुढील आणि मागील नंबर प्लेटवर रिमोट कंट्रोलद्वारे उघड-बंद करता येईल असा काळ्या रंगाचा पडदा बसविण्यात आला होता. रस्त्यात पोलीस किंवा सीसीटीव्ही कॅमेरे दिसताच रिमोटवरील बटण दाबून काही क्षणांत काळा पडदा येऊन नंबर प्लेट पूर्णपणे झाकली जात होती. या अत्याधुनिक युक्तीचा वापर करून संबंधित वाहन अनेकदा पोलिसांच्या नजरेतून निसटत असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले आहे.

Gutkha Smuggling Nashik Crime
Maharashtra Politics Live Update : मयत विलास घुले हत्या प्रकरणातील एका संशयताला SIT ने घेतले ताब्यात

बुधवारी रात्री देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील आहेर वस्ती परिसरात संशयास्पदरीत्या फिरणारी मारुती सुझुकी इर्टिगा कार ग्रामस्थांच्या नजरेस पडली. संशय आल्याने ग्रामस्थांनी तत्परता दाखवत वाहन अडवून त्याची माहिती देवळा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वाहन ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली.

नाशिक विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी चेतन परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विमल पानमसाला आणि व्ही-1 तंबाखूचा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत ४ लाख ९२ हजार २०० रुपये असून, १० लाख रुपये किमतीच्या कारसह एकूण १४ लाख ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी देवळा पोलिसांनी हेमंत प्रभाकर पवार याला अटक केली असून त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, या अवैध गुटखा तस्करीमागील मुख्य सूत्रधार मानला जाणारा कुणाल संजय मेने हा घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

Gutkha Smuggling Nashik Crime
FDA Raid: धडाकेबाज कारवायांनंतर आता FDA ची अजब कारवाई! 'मास्टरमाईंड' सोडला अन् चालकालाच अडकवले

फरार संशयित आरोपी कुणाल मेने याच्याविरुद्ध यापूर्वीच देवळा, वणी आणि दिंडोरी पोलीस ठाण्यांमध्ये गुटखा तस्करीचे तब्बल 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो संघटितपणे हा गुन्हा करत असल्याने त्याच्याविरुद्ध 'मोक्का' अंतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केली आहे. देवळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com