

Nashik Kumbh Mela 2027 : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा जवळ आल्याने प्रशासनाकडून विविध पातळीवर तयारी सुरु आहे. पोलिस प्रशासनाकडून देखील सुक्ष्म नियोजन सुरु असून नाशिक शहर व परिसराच्या सुरक्षेसाठी राज्यभरातून सुमारे ४० हजार पोलिस अधिकारी-अंमलदार बंदोबस्तासाठी दाखल होणार आहेत.
अशात पोलिसांची निवास व भोजनाची गैरसोय होऊ नये, यासाठी नाशिक पोलिस आयुक्तालयाने सूक्ष्म नियोजन केले आहे. त्यानुसार शहरातील १२७ मंगल कार्यालये व लॉन्स, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ६७ लॉजेस अधिग्रहित करण्यात येणार आहेत. येत्या आठवड्यात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत अधिग्रहित करण्यात येणाऱ्या मंगल कार्यालये, लॉन्स व लॉजेसचे चालक-मालक यांची बैठक घेण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत गवळी तसेच सिंहस्थ कक्षातील वरिष्ठ अधिकारी या नियोजनाची अंमलबजावणी करीत आहेत. सिंहस्थासाठी राज्यभरातून येणाऱ्या पोलिस अधिकारी-अंमलदार यांच्या निवास व भोजनासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून पोलिसांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी सांगितले.
६० दिवसांसाठी ताबा व मोबदला
सिंहस्थातील प्रमुख पर्वण्यांचा कालावधी लक्षात घेऊन जुलै ते सप्टेंबर २०२७ या ६० दिवसांच्या (दोन महिन्यांच्या) कालावधीसाठी मंगल कार्यालये, लॉन्स आणि लॉजेस अधिग्रहित करण्यात येणार आहेत. अधिग्रहित मालमत्तांच्या चालकांना शासनाच्या अधिकृत निकषांनुसार आर्थिक मोबदला दिला जाणार आहे.
निवास व भोजन
ज्या मंगल कार्यालये, लॉन्स किंवा लॉजमध्ये पोलिसांच्या निवासाची व्यवस्था केली जाणार आहे, त्याच ठिकाणी त्यांना सकाळचा नाश्ता तसेच भोजन उपलब्ध करून दिले जाणार आहे. भोजन तयार करून देण्याची जबाबदारी संबंधित ठिकाणच्या चालकांवर सोपविण्यात येणार असून, त्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार मोबदला दिला जाणार आहे.
कुंभमेळ्यात कोट्यावधी भाविक येण्याचा अंदाज आहे. अशात वाहतूक कोंडीमुळे बंदोबस्ताच्या ठिकाणी फूड पॅकेट पोहोचविताना विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन तसे नियोजन केले जाणार आहे. वेळेत भोजन न मिळणे तसेच पॅकेटमधील अन्न खराब होण्याचा धोका टाळण्यासाठी पोलिसांना ड्यूटीवर जाताना निवासाच्या ठिकाणाहूनच गरम जेवणाचा टिफिन देण्यात येणार आहे. त्यामुळे बंदोबस्ताच्या ठिकाणी पोलिसांना वेळेत व ताजे भोजन उपलब्ध होणार आहे.
परजिल्ह्यांतून बंदोबस्तासाठी येणाऱ्या हजारो पोलिसांची निवास, भोजन आणि वाहतुकीची गैरसोय होऊ नये, यासाठी एकत्रित नियोजन करण्यात आले आहे. या व्यवस्थेमुळे सिंहस्थाच्या काळात पोलिसांना त्यांच्या कर्तव्यावर अधिक सुलभतेने तैनात करता येईल आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम अधिक चोख करता येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.