

Nashik News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सर्वत्र विविध कामे सुरु आहेत. सगळीकडे रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले असून कामे अर्धवट स्थितीत आहेत. रस्ते खड्डेमय झाले असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था आहे.
शहरातील रस्ते खोदकाम व खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचे नाहक बळी जात आहेत. शनिवारी (दि. १२) रात्रीच्या सुमारास झालेल्या अशाच एका अपघातात रस्त्यात आडव्या टाकलेल्या काळ्या रंगाच्या पाईपांना दुचाकी धडकून सिद्धार्थ गोरे या कामगाराचा मृत्यू झाला. शहरातील कृषी नगर जॉगिंग ट्रॅकजवळ कामावरून घरी परतत असताना हा दुर्देवी अपघात झाला.
दरम्यान, मयत सिद्धार्थ गोरेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी व परिसरातील नागरिकांनी मृतदेह थेट नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर नेत ठिय्या आंदोलन केलं. पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वारावरील गेटला कुलूप लावल्याने नागरिकांनी मृतदेह गेटबाहेर ठेवत ठिय्या आंदोलन केलं.
या अपघातास महापालिका आणि ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप करत मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी व परिसरातील नागरिकांनी प्रवेशव्दाराजवळ घोषणाबाजी केली.
नाशिकमधील खड्डे व खोदकाम नागरिकांच्या जीवावर बेतत असून आतापर्यंतचा हा तेरावा बळी असल्याचं बोललं जात आहे. शहरातील कृषी नगर जॉगिंग ट्रॅकजवळ पाण्याच्या पाइपलाइनचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्यात आडवे काळे पाइप टाकण्यात आले होते. दरम्यान, सिद्धार्थ गोरे हे शनिवारी रात्री कामावरून घरी परतत असताना रात्रीच्या वेळी पावसामुळे आणि अंधार असल्यामुळे रस्त्यात आडवे टाकलेल्या काळे पाइप्स त्यांना दिसली नाही आणि दुचाकी त्या पाईपांना धडकल्याने अपघात झाला.
या अपघातात सिद्धार्थ गोरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण जखमी आहे. या ठिकाणी रस्त्यावर काम सुरु असल्याने सावधगिरी म्हणून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या, त्या ठिकाणी सुरक्षेसाठी कोणतेही रिफ्लेक्टर लावलेले नव्हते असा आरोप नातेवाईकांनी व नागरिकांनी केला. ठेकेदारच या अपघातास जबाबदार असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला. संतप्त नागरिकांनी शहर अभियंता संजय अग्रवाल यांना घेराव घालून जाब विचारला. आम्हाला न्याय देण्यात यावा, अशी मागणी गोरे यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.