
Nashik land scam : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील संगमेश्वर परिसरात गट क्रमांक १४/अ या ग्रीन झोन क्षेत्रातील जमिनीवर अवैध भूखंड वाटपाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जमिनीचे १६ मोठ्या तुकड्यांमध्ये विभाजन करून त्यातून तब्बल २७२ लहान भूखंड तयार करण्यात आले. विशेष म्हणजे, यापैकी २५८ भूखंडांची नोंदणीही अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी उदय किसवे यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. किसवे यांच्या कार्यकाळात (६ जून २०११ ते १५ सप्टेंबर २०१३) हे सर्व व्यवहार झाले असून, याप्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात येईल, तसेच, २०१३ ते २०१९ या सहा वर्षातील मुद्रांक अधिकाऱ्यांनी किती दस्तांची नोंद केली, याचीही प्राथमिक चौकशी सुरू असून, दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
भाजप आमदार आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ही लक्षवेधी सूचना मांडली. पडळकर म्हणाले, मालेगावमधील स्टॅम्प विक्रेते जाकीर आणि आरिफ अब्दुल लतीफ यांनी भूखंड विक्रीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. विशेष बाब म्हणजे संबंधित जमीन १६ मार्च २०१३ रोजी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यात आली होती. मात्र, १४ फेब्रुवारी २०२३ रोजी तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार हा बदल रद्द ठरविला.
बावनकुळे म्हणाले, की संगमेश्वर गट नं. १४८ अ व गुगळवाड येथील गट नं. २५३ यांची अदलाबदल २००२ च्या परिपत्रकानुसार बेकायदेशीर पद्धतीने करण्यात आली. कारण, अशा अदलाबदलीसाठी जमीन सलग असणे आवश्यक असते, जे या प्रकरणात नव्हते. या प्रकरणी आठ मुद्रांक अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देत बावनकुळे यांनी दोषींवर कडक कारवाईचे संकेत दिले. तसेच स्टॅम्पवेंडर जाकीर आणि आरिफ अब्दुल लतीफ यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
संगमेश्वरची जमीन गुगळगावला आणि गुगळगावची जमीन संगमेश्वरला स्वॅप करून नियमांचा भंग केल्याने उदय किसवे यांचे निलंबन करत एका महिन्याच्या आत विभागीय चौकशी पूर्ण करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी यावेळी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.