

Nashik MHADA housing scam Arrest : नाशिक म्हाडा फसवणूक प्रकरणात काही दिवसांपासून कारवाई जरा थंडावली होती. मात्र, पोलिसांनी याप्रकरणात आता भूमी अभिलेख विभागाच्या आणखी एका अधिकाऱ्याला अटक केली. हे प्रकरण उघडकीस आल्यापासून ही सहावी अटक असून यापूर्वी पाच जणांनी जेलची हवा खाल्ली आहे.
आता म्हाडाची फसवणूक केल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयातील परीक्षण भूमापन अधिकारी श्रीकांत प्रकाश परदेशी (वय ४२) यांना पोलिसांनी अटक केली आहे. बनावट नकाशे तयार करण्यात परदेशी यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
शहर गुन्हेशाखा युनिट- १ च्या पथकाने मंगळवारी (दि. ७) सायंकाळी परदेशी यांना भूमी अभिलेख कार्यालयातून ताब्यात घेत अटक केली. बुधवारी (दि. ८) जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने परदेशी यांना १० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
शहरातील ४९ गृहप्रकल्पांमध्ये म्हाडाच्या सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील आर्थिक दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) २० टक्के आरक्षित क्षेत्र ठेवण्याच्या नियमाला फाटा देत बनावट दस्तऐवजांच्या आधारे म्हाडाची फसवणूक केल्याप्रकरणी भूमी अभिलेख विभागाच्या तक्रारीवरून नाशिकच्या सरकारवाडा पोलिस स्थानकात तब्बल १९४ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात काही जणांना अटक सत्र सुरु करताच बिल्डर लॉबीचे धाबे दणाणले.
२०१३ च्या गृहनिर्माण धोरणानुसार ४,००० चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडांवर २० टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी राखीव ठेवणे बंधनकारक असताना, कृत्रिम भूखंड विभाजन करून हा नियम टाळल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात यापूर्वी बांधकाम व्यावसायिक दिनेश कन्हय्यालाल उर्फ सोनू मनवानी, दीपक भगवानदास करमचंदानी, नायब तहसीलदार नितीन पाटील, तत्कालीन फिर्यादी व भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपीन काजळे तसेच महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील यांना अटक करण्यात आली होती. सध्या या सर्वांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यापू्र्वी अटक करण्यात आलेल्या संशयितांसोबत परदेशी यांचे कनेक्शन समोर आले आहे.
असा आहे परदेशी याचा कटात सहभाग
भूमी अभिलेख कार्यालयाच्या बनावट सही व शिक्क्यांचा वापर करून खोटे मोजणी नकाशे व आकारफोड पत्रके तयार करण्यात आल्याचा आरोप अटकेतील संशयित आरोपी श्रीकांत परदेशी यांच्यावर आहे.
तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या बनावट नकाशांवरील हस्ताक्षरांची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. या हस्ताक्षरांचा संबंध श्रीकांत परदेशी याच्याशी असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. (Nashik News)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.