Nashik MLC Election : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे अपक्ष उमेदवार गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांनी माघार घेत प्रचार थांबविला आहे. त्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा मार्ग सुकर झाला आहे.
मात्र, तरीही तांत्रिकदृष्ट्या मतपत्रिकेवर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते व प्रसाद हिरे दोघांचीही नावे कायम राहणार असल्याने व निवडणुकीत व्हीप बजावण्याची तरतूद नसल्याने महायुतीने सावध भूमिका घेतली आहे.
खबरदारी म्हणून महायुतीच्या मतदार नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज शनिवारी (दि. १३) नगरसेवकांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महायुतीने शुक्रवारी (दि. १२) नाशिकमधील एका तारांकित हॉटेलमध्ये सर्वच मतदारांना पाचारण करीत मतदानाबाबत धडे दिले. बैठकीत उपस्थितीत सर्व महायुतीच्या नेत्यांनी सर्व मतदारांना पक्षादेश पाळण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
महायुतीकडे एकूण ६१९ पैकी ४६६ मते असल्याचा दावा करण्यात येत आहे. मतदानात दगाफटका होऊ नये यासाठी महायुतीच्या सर्व मतदारांना मुंबईला एका हॉटेलमध्ये नेण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशीच त्यांना पुन्हा आणले जाईल.
दरम्यान, निवडणूक जवळ आली असतानाही काही मतदारांशी संपर्क होत नसल्याच्या चर्चा सुरू झाल्याने महायुतीने मतदार नगरसेवकांची मुंबई सहल आयोजित करण्याचा निर्णय घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, नगरसेवकांना मुंबईतील मालाड येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी नेले जाणार आहे.
अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी प्रचार थांबवला असला तरी त्यांनी नरेंद्र दराडे यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यांनी केवळ आपण प्रचार थांबवत असल्याचं म्हटलं आहे. त्यात माघारीची वेळ निघून गेल्याने मतपत्रिकेवर अपक्ष गोकुळ गिते व प्रसाह हिरे दोघांचे नाव कायम राहणार आहे. अपक्ष उमेदवारांच्या वतीने पोलिंग एजंट नियुक्तीचे फॉर्म नेण्यात आले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महायुतीने सावधगिरी बाळगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.