

Police officer extortion Nashik: नाशिकमध्ये अवैध सावकारीचे प्रकार समोर येत असून त्याविरोधात नाशिक पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. अवैधरीत्या सावकारीप्रकरणी शहर पोलिसांनी गेल्या काही महिन्यांत 34 हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत.
नाशिक शहर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरु केलेली 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला', "ऑपरेशन क्लिनअप' मोहिम राज्यभरात चर्चेत असून नाशिककरांनाही दिलासा मिळाला आहे.
या मोहीअंतर्गत नाशिक पोलिसांनी गुन्हेगारीत सहभागी असलेल्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही खाक्या दाखवला आहे. त्यामुळे पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक वाढल्याने नागरिक तक्रारीसाठी पुढे येऊ लागले आहे.
असे असताना अवैध सावकारीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आला आहे. काही सावकारांनी चक्क महिला पोलिस उपनिरीक्षकालाच धमकावून खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयित अवैध सावकाराने महिला उपनिरीक्षकाला व्याजाने दिलेल्या रकमेवर अव्वाच्या सव्वा व्याज आकारून रक्कम उकळली आहे.
तसेच, त्यांच्या फ्लॅटवरही कब्जा करण्याची धमकी दिली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यात दोन महिलांचाही समावेश आहे. संशयित फरार असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
शहर पोलिस दलातील महिला पोलिस उपनिरीक्षक निशा हिराजी वाकडे यांच्याकडून संशयित सावकरांनी खंडणी उकळली आहे. निशा वाकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना आर्थिक अडचण असल्याने त्यांनी अवैध सावकार संशयितांकडून साडेतीन टक्के व्याजाने १० लाख रुपये घेतले.
त्याबदल्या संशयित सावकारांनी वाकडे यांचा बोधले नगर येथील साई संजीवनी सहकारी गृहनिर्माण संस्थेतील फ्लॅटचे खरेदीखत, सोसायटी शेअर प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र असे कागदपत्रेही गहाण ठेवून घेतले होते. या मालमत्तेचे जनरल मुखत्यार पत्र लिहून व नोंदवून त्या मोबदल्यात त्याने १० लाख रुपये दिले होते.
संशयित सावकारांनी श्रीमती वाकडे यांच्याकडून दरमहा ४२ हजार रुपये व्याजाने १ लाख २६ हजार रुपये तीन महिन्यांचे वसुल केले. त्यानंतरही २ लाख ७० हजार रुपये असे एकूण ३ लाख ९६ हजार ५०० रुपये उकळले होते.
तर, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे व्याजाचे १ लाख २६ हजार रुपयांची मागणी करीत त्यासाठी तगादा लावत होते. पैसे न दिल्यास संशयितांनी गहाण ठेवलेली मालमत्तेवर कब्जा करून त्याची विक्री करून तुला बेघर करीन आणि बघून घेईल अशीही धमकी देत शिवीगाळ केली.
यांच्यावर गुन्हा दाखल
विक्की कुमावत (रा. विठ्ठल मंगल कार्यालयाजवळ, जेलरोड), सोनाली संदीप जोधंवाळ (रा. हॉली फ्लॉवर स्कूलजवळ, जेलरोड), अनंता पवार, देवयानी पिसे अशी अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित सावकारांची नावे आहेत. प्रत्यक्षात संशयितांकडे सावकारीचा कोणताही परवाना नव्हता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.