Rajabhau Waje News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटले. त्यामुळे बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत वेगळीच अडचण होणार आहे. विशेषता या सहा खासदारांच्या मतदारसंघात भाजप आणि सहकारी पक्षांच्या इच्छुकांच्या मार्गात नवा अडसर निर्माण झाला आहे.
नाशिकचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी निष्ठेचा झेंडा उचलून धरला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रलोभनांना त्यांनी नकार दिला. त्यामुळे सहा फुटलेल्या खासदारांत नाशिकचा समावेश नाही. त्याचा राजकीय परिणाम लोकसभा निवडणुकीत काय होतो, याची उत्सुकता आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी वेगळा गट निर्माण केला आहे. त्यामुळे या सहा मतदारसंघांमध्ये त्यांच्या विरोधात उमेदवारी केलेल्या भाजपच्या उमेदवारांपुढे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारीकडे डोळे लावून बसलेल्या त्या संभाव्य उमेदवार आणि इच्छुकांची कोंडी झाली आहे.
नाशिकला गेल्या टर्ममध्ये हेमंत गोडसे हे शिवसेना ठाकरे पक्षाचे दोन टर्म खासदार होते. मात्र पक्षात फूट पडल्यावर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. विकास कामे करण्यासाठी पक्षांतर केल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र बहुतांश समर्थकांना त्यांचा तो निर्णय आवडलेला नव्हता, अशी चर्चा समर्थकांत होती.
पक्षांतर केल्यामुळे माजी खासदार हेमंत गोडसे यांना गेल्या निवडणुकीत उमेदवारी सहज मिळेल असा त्यांचा दावा होता. प्रत्यक्षात खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी त्यांची उमेदवारी देखील जाहीर केली होती. भाजपने त्यात मोठा अडथळा निर्माण केल्याने गोडसे यांची उमेदवारी लटकली.
महाविकास आघाडीने मात्र हेमंत गोडसे यांनी बंडखोरी केल्याने त्यांच्या जागेवर विना विलंब माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी घोषित केली होती. त्यामुळे गोडसे यांना उमेदवारी मिळतात की छगन भुजबळ हे भाजप पुरस्कृत उमेदवार होतात हा राजकीय वाद रंगला. त्याचा फटका हेमंत गोडसे यांना बसला.
माजी खासदार गोडसे यांना प्रचार सुरू करावा की नाही असा प्रश्न पडला होता. त्यात वाजे यांना मोकळे मैदान मिळाले. त्याचे मायलेज घेत त्यांनी जोरदार प्रचार करून मतदार संघात आघाडी घेतली. मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला. यंदा पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागचाच डाव पुन्हा टाकला आहे. मात्र नाशिकचे खासदार वाजे यांनी ती ऑफर अव्हेरली. त्यामुळे ठाकरे गटात वाजे हे थांबल्याने त्यांचा उमेदवारीवर अधिकार असेल.
या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात गेल्या काही दिवसात नाराज असलेल्या माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या आहेत. आगामी निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना शिंदे पक्ष हेमंत गोडसे यांचे पुनर्वसन करील का? याची चर्चा सुरू झाली आहे. वाजे ठाकरे गटात थांबल्याने शिंदे गटात गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचा पुरस्कार म्हणून हेमंत गोडसे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आगामी निवडणुकीची चर्चा या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यासाठी शिवसेना असेल तर पक्ष हेमंत गोडसे यांना प्राधान्याने उमेदवारी देऊ शकतो. मात्र त्यात पुन्हा भाजप आणि अन्य सहकाऱ्यांचा अडथळा आल्यास पुन्हा गोडसे यांच्या मार्गात अडथळा तर निर्माण होणार नाही ना? ही राजकीय शक्यता चर्चेत आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.