Nashik Politics : भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिकेत भाजपला 'कुबड्यांची गरज नाही', भाजपला स्पष्ट बहुमत आहे असे म्हटले होते. गिरीश महाजन यांचे हेच वक्तव्य शिवसेना शिंदे गटाला चांगलेच झोंबल्याचे दिसत आहे. शिवसेनेने महाजन यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले असून भाजपवर आणखी दबाव वाढवण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे दिसत आहे.
शिवसेनेचे उपनेते तथा महापालिकेतील गटनेते अजय बोरस्ते यांनी महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार हे स्वतः आमच्या कार्यालयात सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते. त्यामुळे महाजनांचे वक्तव्य चुकीचे असून, भाजपमध्ये समन्वयाचा अभाव यावरून दिसत असल्याची टीका बोरस्ते यांनी केली आहे.
नाशिक महापालिकेत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली होती. तर राष्ट्रवादी व शिवसेना हे दोन्ही एकत्रित निवडणुकीला सामोरे गेले होते. भाजपने १२२ पैकी ७२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवूनही भाजपचे शहराध्यक्ष सुनिल केदार हे वरिष्ठांना विश्वासात न घेता या दोन्ही घटक पक्षांना सत्तेत सहभागी करुन घेण्यासाठी उतावीळ झाल्याचे दिसून आले. त्यांनी दोन्ही घटक पक्षांना सत्तेत सहभागी होण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जाऊन आवतन दिले. मात्र महाजन यांनी दोन्ही पक्षांना सत्तेत सहभागी करुन घेण्यास नकार दिल्याने शहराध्यक्ष केदार यांनी परस्पर घेतलेली भूमिका त्यांच्याच अंगलट आली.
नाशिकमध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली असून, नंतर एकत्र येण्याचा प्रश्नच येत नाही असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. भाजपला कुणाच्या कुबड्यांची गरज नाही असे म्हणत त्यांनी एकप्रकारे स्पष्ट शब्दात शिवसेना -राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करुन घेण्यास नकार दर्शवला. मात्र भाजपकडूनच प्रस्ताव आला आणि आता तेच नाही म्हणत असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवकांनी केला आहे.
दरम्यान मुंबईत पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात शिंदे सेनेला नाशिकच्या सत्तेत वाटा मिळेल हा मुद्दा माध्यमांमध्ये आणून भाजपवर शिवसेनेने दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरुवातीच्या टप्प्यातच केला होता. मात्र आता गिरीश महाजन यांनी नकार दिल्याने शिवसेनेने स्थानिक पातळीवर भाजपवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी आता शिवसेनेने कंबर कसली आहे. महापौरपदासाठी रंजना बोराडे यांनी तर विलास शिंदे, सुवर्णा मटाले आणि राहुल दिवे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न हाणून पाडत दबाव वाढवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.