
Nashik News : नाशिक महापालिकेत मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे महापालिकेकडून विविध सेवांचे खाजगीकरण करण्यात येत आहे. शहरातील विविध प्रकारच्या उपद्रवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने कंत्राटी पद्दतीने उपद्रव शोधक पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपद्रव शोधक पथकात सैन्यदलातील माजी सैनिक व अधिकारी यांना प्राधान्य दिले जाणार आहे. महापालिका कंत्राटी पद्धतीने माजी सैनिकांना मानधनावर नियुक्त करणार आहे. यातून माजी सैनिकांना रोजगारही मिळेल व पुन्हा जनसेवेची संधीही मिळणार आहे.
शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा किंवा राडारोडा टाकणे किंवा तो जाळणे, रस्त्यांवर घाण करणे, बांधकाम प्रकल्पांवर हरित जाळीचा वापर न करणे, पाणी साचवून डासांच्या उत्पत्तीला प्रोत्साहन देणे, उघड्यावर लघू शंका करणे अशी विविध कृत्य करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पथकाकडे इलेक्ट्रॉनिक हॅडल डिव्हाईस दिले जाणार असून त्यामाध्यमातून दंडाच्या पावत्या काढल्या जाणार आहेत. जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांमार्फत समितीची नेमणूक करुन कंत्राटी पद्दतीने भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
उपद्रव शोध पथकाच्या पथक प्रमुख पदासाठी लष्करी सेवेत मानद लेफ्टनंट, मानद कॅप्टन किंवा सुभेदार मेजर किंवा नौदल व हवाई दलात समकक्ष पदावरुन सेवा निवृत्त अशी अर्हता आहे. या पदासाठी दरमहा ४५ हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. ६० सुरक्षा सहायक व त्यावर एक विभागीय पथक प्रमुख कार्यरत असेल. विभागीय पथक प्रमुख पदासाठी दरमहा ४० हजार रुपयांचे मानधन निश्चित करण्यात आले आहे. यासाठी सैन्यात सुभेदार, नायब सुभेदार पदावरून निवृत्त किंवा नौदल आणि हवाई दलात समकक्ष पदावरून निवृत्तांना संधी दिली जाणार आहे.
तर सुरक्षा साहयकास ३५ हजार रुपये इतके वेतन दिले जाणार आहे. या पदासाठी सैन्य दलात शिपाई, नायक, हवालदार या पदांवरून निवृत्त किंवा नौदल व हवाई दलात समकक्ष पदावरून निवृत्त जवान अर्ज करू शकणार आहेत.
उपद्रव शोध पथकात एक पथक प्रमुख, १२ विभागीय पथक प्रमुख व ६० सुरक्षा सहायक अशी अशी एकूण ७३ पदांवर माजी लष्करी अधिकारी व जवानांची भरती करण्यात येणार आहे. त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था देखील महापालिकेकडून केली जाणार आहे. दरमहिन्याला निश्चित केलेल्या मानधनाव्यतिरिक्त कोणतेही भत्ते किंवा टीए, डीए अथवा अन्य प्रदान केले जाणार नाही. एकुण १२ उपद्रव पथकांच्या माध्यमातून शहरात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्याचे महत्वाचे काम पार पाडले जाणार आहे.
अशी आहे अट
उमेदवाराला सैन्य दलातील किमान १५ वर्ष सेवेचा अनुभव बंधनकारक आहे.
पथक प्रमुखासाठी वयोमर्यादा ५८ वर्ष, विभागीय पथक प्रमुख आणि सुरक्षा सहायक पदासाठी ५० वर्ष पूर्ण केलेली असावी.
वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला पुरावा म्हणून सादर करावा लागणार आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून इमेलवर पाठविता येईल.
पात्र ठरलेल्या उमेदवाराची मुलाखत प्रक्रियेतून समिती निवड करणार आहे.
केवळ निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.