NMC Recruitment 2026 : नाशिक महापालिकेत 204 पदांसाठी मेगाभरती; महिन्याला 1.10 लाखांपर्यंत पगार, असा करा अर्ज!

NMC Recruitment 2026 : नाशिक महानगरपालिकेत 204 पदांसाठी मेगाभरती जाहीर. पात्र उमेदवारांना 1.10 लाखांपर्यंत मासिक पगार मिळण्याची संधी. जाणून घ्या शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि भरतीची सविस्तर माहिती.
Nashik Mahanagarpalika Bharti
Nashik Mahanagarpalika BhartiSarkarnama
Published on: 
Updated on: 

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नाशिक महानगरपालिकेत तब्बल 204 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 18 संवर्गांमधील ही पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे, काही पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1.10 लाख रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

नाशिक महानगरपालिका भरती 2026 साठी 25 नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 2 डिसेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी, विविध विषयांचे तज्ज्ञ डॉक्टर, स्टाफ नर्स, एएनएम, मिश्रक आणि संगणक ऑपरेटर यांसह विविध पदांचा समावेश आहे.

Nashik Mahanagarpalika Bharti
CJP Election Strategy : CJP युपी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? अभिजीत दीपकेंनी स्पष्टच सांगितली पुढची रणनीती

या भरतीतील वेतनाबाबत सांगायचे झाल्यास, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ या पदांसाठी दरमहा 1,10,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. तर वैद्यकीय अधिकारी पदासाठी 75,000 रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. स्टाफ नर्स, एएनएम, मिश्रक आणि संगणक ऑपरेटर पदांसाठी दरमहा 23,455 रुपये मानधन मिळणार आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

एकूण 204 जागांमध्ये स्टाफ नर्सच्या 79, एएनएमच्या 57, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 15, मिश्रकच्या 15 आणि संगणक ऑपरेटरच्या 10 जागांचा समावेश आहे. याशिवाय इतर तज्ज्ञ डॉक्टर आणि तंत्रज्ञांची 28 पदे भरली जाणार आहेत.

उमेदवारांची निवड कशी होणार?

उमेदवारांची निवड एकूण 100 गुणांच्या आधारे केली जाणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रतेच्या अंतिम वर्षातील गुणांना 50 टक्के, तर मुलाखतीला 50 टक्के महत्त्व दिले जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीची नियुक्ती 6 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात केली जाणार आहे. ही भरती मानधन तत्त्वावर असेल.

Nashik Mahanagarpalika Bharti
Rahul Gandhi : राहुल गांधींनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला रितेश-जेनेलियाचा रोमँटिक फोटो; नेमकं कारण काय?

नाशिक महापालिका भरतीसाठी अर्ज कुठे करायचा?

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी नाशिक महानगरपालिकेच्या https://nmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सार्वजनिक आरोग्य विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष सादर करायचा आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर 2026 असल्याने इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचून पदनिहाय शैक्षणिक पात्रता, अटी आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती तपासणे महत्त्वाचे आहे.