

Nashik News : राज्याच्या समाजकल्याण विभागाने मे २०२१ मध्ये कायदा करून महापालिका हद्दीतील रस्ते, चौक, वाड्या आणि वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचे निर्देश दिले होते. त्याची अंमलबजावणी झाली आहे किंवा नाही, याची फेरतपासणी सुरू झाली आहे. त्यामुळे नाशिक शहरातील रस्ते, चौक, वाड्या आणि वस्त्यांना असलेली जातिवाचक नावे हटविण्याच्या मोहिमेला पुन्हा वेग आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जातिवाचक नावे हटवल्याचा तसेच शिल्लक नसल्याचा अहवाल आणि गॅझेट तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने ८१ ठिकाणांची नावे बदलून गॅझेट प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पूर्वी अनेक वस्त्या, पाडे तसेच रस्त्यांना जातिवाचक नावे दिली जात असे. ती नावे आजही कायम आहेत. परंतु सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीकोनातून सदरची जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय राज्याच्या समाज कल्याण विभागाने घेतला.
यासंदर्भात नाशिक महापालिकेच्या समाजकल्याण विभागाने सर्वेक्षण केले होते. त्यात शहरातून ८१ जातिवाचक नावांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यांनंतर महासभेने त्यांना मंजुरीही दिली होती. मात्र, प्रत्यक्षात नावे बदलताना काही ठिकाणी स्थानिक पातळीवर विरोध झाला होता. विरोध करणाऱ्यांचे प्रबोधन केले जाणार होते.
दरम्यान, यासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव करून नावे बदलल्याचे गॅझेट प्रसिद्ध करून अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार नाशिक महापालिका आता ८१ ठिकाणांचे गॅझेट प्रसिद्ध करणार आहे.
अशी आहेत गल्ल्यांची नावे (कंसात बदललेले नाव)
पूर्व विभाग : जुनी तांबट गल्ली (ओंकार लेन), कुंभारवाडा (भूमीनगर), माळी गल्ली (निसर्ग गल्ली), तेली गल्ली (रामशेज गल्ली), मातंगवाडा (स्वाभिमाननगर), राजवाडा (प्रगतीनगर), कोकणीपुरा (जनतानगर), कोळीवाडा (कौशल्यनगर), माळी गल्ली (निर्मल गल्ली), बुरूड गल्ली (यशवंत गल्ली), जोगवाडा (शरयूनगर), मुल्तानपुरा (शहीदनगर), साळी गल्ली (शांतिनगर), काझीपुरा (इन्कलाबनगर), वैदुवाडी (अहिंसानगर), आदिवासी वाडा (क्रांतीनगर), माळी गल्ली (उपासनानगर), रामोशीवाडा (सहकारनगर).
पश्चिम विभाग : नवीन तांबट लेन (संस्कृती लेन), लोणार लेन (विवेक लेन), मातंगवाडा (मुक्तीवाडा), ख्रिश्चनवाडी (जयपूरनगरी), कुंभार वाडा (धरतीनगर), साळीवाडा (स्नेहनगर ), जुने तांबट लेन (चैतन्य लेन) काजीगडी (गोदागडी).
पंचवटी विभाग : वैदुवाडी (पैनगंगानगर), मांगवाडा (नर्मदानगर), धनगर गल्ली (जय हिंदनगर), जोशी वाडा (रायगडनगर), तांबोळी नगर (वेदश्रीनगर), भराडवाडी (रायरेश्वरनगर), वडारवाडी (रामशेजनगर), मोठा राजवाडा (सिंधूनगर), नाथ गल्ली (आनंदीनगरी), पाथरवट लेन (कमल नयन लेन), कोमटी गल्ली (देवगिरी नगरी), भोईवाडा (जनस्थाननगर), कुंभार गल्ली (कलाकृतीनगर), चांभार गल्ली (त्रिकटकनगर), कोळीवाडा (हुतात्मानगर).
नाशिक रोड विभाग : बौद्ध वाडा (समतानगर), गोसावीनगर (आराधनानगर), गवळीवाडा (राधानगरी), बौद्धनगर (नालंदानगर), लिंगायत कॉलनी (तक्षशिला कॉलनी), गोसावीवाडी (जुईनगर), धोबी गल्ली (कल्पवृक्षनगर), महावीरनगर (रायगडनगर), जैन कॉलनी (सम्यकनगर), बौद्धवाडा (गोकुळधाम), मांगवाडा (गोवर्धननगर), धनगर गल्ली ( टायगर गल्ली), तेली गल्ली (प्रगतीनगर), भोई गल्ली (विकासनगर), वाल्मीकनगर (निर्माणनगर), कुंभार गल्ली (कुशलनगर), चांभारवाडा (क्रांतीनगर), लोहार गल्ली (कामगारनगर).
सिडको विभाग : हाजीनगर (खुशबूनगर), झेनतनगर (महेकनगर), हरदास कॉलनी (गुंजन कॉलनी), भिलवाडा (सहजीवननगर), कोळीवाडा (श्रमिकनगर), कोळीवाडा (कर्मयोगीनगर), विश्वकर्मा (आविष्कारनगर).
सातपूर विभाग : कोळीवाडा (गोदावरीनगर), जोशीवाडा (रायगडनगर), कोळीवाडा (सागरवाडा), कोळीवाडा (अंजनेरीनगर), माळी कॉलनी (मयूर कॉलनी), कोळीवाडा (नंदिनीनगर).
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.