

Nashik Farmers News : आगामी उन्हाळ्यात संभाव्य चाराटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचे अवशेष जाळून न टाकता पशुधनासाठी चारा म्हणून जतन करावेत. तसेच डोंगराळ भागातील नैसर्गिक गवताचे नियोजनबद्ध संकलन करून गावपातळीवर चारा साठा निर्माण करावा. उपलब्ध वैरणीची नासाडी टाळण्यासाठी कडबा कुट्टी यंत्राचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले आहे.
पिकांचे अवशेष म्हणजे पशुधनासाठी मौल्यवान चारा
नाशिक जिल्ह्यात गाय, म्हैस, शेळ्या व मेंढ्यांचे मोठ्या प्रमाणावर संगोपन केले जाते. आगामी उन्हाळ्यात संभाव्य चाराटंचाई लक्षात घेता सध्या उपलब्ध असलेल्या चारा संसाधनांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. खरीप हंगामानंतर शेतात उपलब्ध होणारे भाताचे पिंजर, मक्याचा कडबा, ज्वारी-बाजरीची ताटे व इतर पिकांचे अवशेष जाळल्यामुळे पशुधनासाठी उपलब्ध होणारा चारा नष्ट होतो. तसेच त्यामुळे हवेचे प्रदूषण होऊन जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पिकांचे अवशेष व्यवस्थित वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवावेत.
कडबा कुट्टी यंत्राचा वापर करून चाऱ्याची बचत करा
जनावरांना लांब ताटे किंवा अखंड कडबा खाण्यास दिल्यास त्यातील काही भाग पायाखाली तुडविला जातो किंवा गोठ्यात विखुरला जातो. परिणामी मोठ्या प्रमाणावर वैरणीची नासाडी होते. ही नासाडी टाळण्यासाठी कडबा कुट्टी यंत्राच्या साहाय्याने ज्वारी-बाजरीचा कडबा, मक्याची ताटे, भाताचे पिंजर व इतर योग्य वैरणीचे पशुधनाच्या प्रकारानुसार बारीक तुकडे करून जनावरांना खाण्यास द्यावेत. कुट्टी केलेला चारा स्वच्छ गव्हाणीत द्यावा. जनावरांच्या गरजेनुसार हिरवा चारा, सुका चारा व संतुलित पशुखाद्याचा समावेश करावा. कुट्टी यंत्राचा वापर करताना आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन करावे.
डोंगराळ भागातील नैसर्गिक गवताचे संकलन करा
जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, कळवण, दिंडोरी व बागलाण या डोंगराळ भागांमध्ये पावसाळ्यानंतर नैसर्गिक गवत उपलब्ध होते. हे गवत वाळून नष्ट होण्यापूर्वी किंवा वणव्यामध्ये जळण्यापूर्वी योग्य वेळी त्याची कापणी करून सुक्या चाऱ्याच्या स्वरूपात साठवणूक करावी. ग्रामपंचायत, पशुपालक, शेतकरी गट व महिला बचत गट यांच्या सहभागातून गावनिहाय गवत संकलन मोहीम राबवावी. सार्वजनिक जमिनीवरील गवताचे संकलन संबंधित विभागाच्या परवानगीने, तर वनक्षेत्रातील संकलन वन विभागाच्या नियमांनुसार आवश्यक मंजुरी घेऊनच करावे. नैसर्गिक गवताची पुनर्वाढ आणि जैवविविधता टिकविण्याची काळजी घ्यावी.
प्रत्येक गावात चारा बँक निर्माण करण्यावर भर
ग्रामपंचायत, दुग्ध सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व महिला बचत गट यांच्या सहभागातून पिकांचे अवशेष आणि नैसर्गिक गवताचे संकलन करून गावपातळीवर चारा बँक निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अतिरिक्त चारा गरजू पशुपालकांना उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पशुधन ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची महत्त्वाची संपत्ती असल्याचे नमूद करताना, आगामी उन्हाळ्यात संभाव्य चाराटंचाई टाळण्यासाठी महसूल, कृषी, पशुसंवर्धन, वन विभाग व ग्रामपंचायतींनी समन्वयाने चारा संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक शेतकरी व पशुपालकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी ग्रामपंचायतींनी गावनिहाय चारा संकलन व साठवणुकीचे नियोजन करावे, असे सांगितले. तसेच पशुसंवर्धन व कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी चारा संवर्धन, कुट्टी, साठवणूक आणि योग्य पशुआहार व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.