Nashik News: शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावरील कारवाईनंतर नाशिकच्या राजकारणात भूंकप घडला. यातूनच आता चक्क वादग्रस्त व गुन्हा दाखल असलेल्या भाजपच्या एका माजी नगरसेवकाला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. ज्यांना अपेक्षित होता पोलिसांचा 'पाहुणचार' त्यांना मिळाले चक्क पोलिस संरक्षण, हा चर्चेचा विषय आहे.
सध्या सत्ताधारी पक्षाच्या कोणत्या नेत्याला कधी महत्त्व येईल अन् चक्क पोलिस संरक्षण मिळेल, याचा नेम राहिलेला नाही. पोलिसांत गुन्हा दाखल असलेल्या तसेच नुकत्याच शहरात मध्यरात्री घडलेल्या गोळीबाराशी नाव जोडले गेलेल्या भाजपच्या एका माजी नगरसेवकाला पोलिसांनी अचानक संरक्षण दिले आहे.
नुकतेच पोलिसांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे महानगरप्रमुख, माजी नगरसेवक बंटी तिदमे, भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांचे निकटवर्तीय दिलीप खैरे यांना पोलिसांनी संरक्षण दिले आहे.
संबंधितांनी थेट नागपूर शहरातून राजकीय मॅनेजमेंट करून पोलिस सुरक्षा मिळविल्याचे बोलले जाते. तसे पाहिले तर सुरक्षा पुरविण्यामागे कोणताही कोणताही ठोस मुद्दा नसताना संरक्षण मिळाले आहे. त्याचा शहरातील सध्या चर्चेत असलेल्या विविध राजकीय घटनांशी संबंध जोडला जात आहे.
सिडकोतील पवननगर येथे अलीकडेच मध्यरात्रीच्या सुमारास सराईत गुन्हेगार रोहित मल्ले याने हवेत गोळीबार केला होता. या प्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हाही दाखल आहे. मात्र, अद्याप मल्ले यास अटक झालेली नाही. गोळीबाराच्या वेळी माजी नगरसेवक शहाणे घटनास्थळी उपस्थित असल्याचे बोलले जाते. याशिवाय अन्य एका प्रकरणात शहाणे याच्या विरोधात इगतपुरीमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्याला पोलिसांनी पोलिस संरक्षण का दिले, याचा उलगडा होऊ शकलेला नाही.
शिवसेना (ठाकरे गट) नेते सुधाकर बडगुजर यांचा फोटो आणि व्हिडीओ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबतचे असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले होते. त्यानंतर एसआयटी मार्फत बडगुजर यांची चौकशी सुरू झाली. एसीबीने देखील बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला. शहाणे प्रकरणाशी संबंधित पोलिस निरीक्षकाची नुकतीच पोलिस नियंत्रण कक्षात बदली देखील झाली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणानंतर शहरातील राजकारण तापल्याने या घटनांची राजकीय कार्यकर्त्यांत चर्चा आहे.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.