

Nashik Kumbh Mela water reservation : आगामी सिंहस्थ कुंभमेळा, शहरात वाढू शकणारी लोकसंख्या आणि संभाव्य दुष्काळाचे संकट लक्षात घेऊन नाशिक महापालिकेने पाणी आरक्षणाचे नियोजन केले आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ८ हजार २८० दशलक्ष घनफूट (दलघफू) पाणी आरक्षित करण्यासाठी सुधारित प्रस्ताव पाठविला आहे.
१५ ऑक्टोबर २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२७ या कालावधीत नाशिक शहराचा दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ७ हजार ६४५ दलघफू पाण्याची आवश्यकता प्रस्तावात नमूद करण्यात आली आहे. याशिवाय जुलै-ऑगस्ट २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान साधुग्राम तसेच देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या लाखो भाविकांच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी ६३५ दलघफू अतिरिक्त पाणी राखून ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
धरणनिहाय पाणी आरक्षणाचा विचार करता, गंगापूर धरण समूहातून शहराच्या नियमित वापरासाठी ५ हजार ७१५ आणि सिंहस्थासाठी ६५ दलघफू, असे एकूण ५ हजार ७८० दलघफू पाणी मागण्यात आले आहे. मुकणे धरणातून शहरासाठी १ हजार ७०० आणि सिंहस्थासाठी ५७० दलघफू, असे मिळून २ हजार २७० दलघफू पाण्याची मागणी आहे. तर दारणा धरणातील चेहेडी बंधाऱ्यातून शहरासाठी २३० दलघफू पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव आहे.
अल-निनोच्या संभाव्य परिणामामुळे ग्रामीण भागात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील जवळपास दहा टक्के लोकसंख्या नाशिक शहराकडे स्थलांतरित होऊ शकते, असा अंदाज महापालिकेने व्यक्त केला आहे. या संभाव्य वाढीव लोकसंख्येची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी आणखी २७५ दलघफू पाण्याची तरतूद करण्याची मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्य शासनाने पाणी आरक्षणामध्ये दहा टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्याचे व्यापक महत्त्व आणि त्यासाठी आवश्यक असलेली पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन नाशिक शहराला या कपातीच्या निर्णयातून सूट द्यावी, अशी मागणीही महापालिकेने केली आहे.
दुसरीकडे, भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिकेकडून पाणीपुरवठा यंत्रणेचे बळकटीकरण करण्यात येत आहे. गंगापूर धरणापासून बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १ हजार ८०० मिमी व्यासाची नवीन गुरुत्ववाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबरअखेर या वाहिनीची चाचणी घेऊन ती प्रत्यक्ष वापरात आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यासोबतच बारा बंगला आणि पंचवटी येथील जलशुद्धीकरण केंद्रांची पाणी प्रक्रिया क्षमता वाढविण्याचे कामही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.