

Nashik SIR Duty : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) अंतर्गत अनेक प्राथमिक शाळांतील शिक्षकांची बीएलओ म्हणून पूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना आता पुन्हा त्याच शाळांमधील इतर शिक्षकांचीही सहायक बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याने त्याला महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेने विरोध दर्शवला आहे.
शैक्षणिक कामकाजावर याचा परिणाम होत असून या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे संजय चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांनी याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्याचे सांगितले.
नाशिक शहर तसेच जिल्हा परिसरातील शिक्षकांना विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत जबाबदारी देण्यात आली आहे. याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होत आहे. जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा होऊन शाळा सुरु झाल्या आहेत. अशात शाळेत पुरेसे शिक्षक उपलब्ध नसल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. हीच गोष्ट पालकांनाही आम्ही समजून सांगत असून त्यांना सोबत घेऊनच आम्ही बीएलओ व सहायक बीएलओ म्हणून शिक्षकांच्या नियुक्तीला विरोध करत असल्याचं संजय चव्हाण म्हणाले.
एकीकडे शाळा सुरु झाल्या आहेत असे असताना दुसरीकडे याचवेळी शिक्षकांवर पुनरीक्षण कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याचा विचार करता सुमारे दोन हजार शिक्षक या कामात गुंतले आहेत. काही शिक्षक या कामात अडकल्याने याचा अतिरिक्त भार अन्य शिक्षकांवर येत आहे. यामुळे शिक्षक वर्गात नाराजी असून अस्वस्थता आहे.
शासनाने ही जबाबदारी शिक्षकांना देण्याऐवजी बेरोजगार युवकांना द्यायला हवी असे मत महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे संजय चव्हाण यांनी व्यक्त केले. शिक्षकांना काम दिल्यामुळे अध्यापनावर याचा परिणाम होणार आहे. शिक्षकांना पगार दिला जातो. शिक्षकांची नियुक्ती ही विद्यार्थ्यांनी शिकवण्यासाठी असते. बेरोजगार युवकांना या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली असती तर शिक्षकांचा भार कमी झाला असता. तसेच, याबाबत शिक्षक संघटना उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी, एसआयआर सर्व्हेक्षण कामकाजाविषयी शिक्षकांमध्ये नाराजी असली तरी हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने जबाबदारी दिलेल्या शिक्षकाला हे काम करावेच लागणार असल्याचे म्हटले आहे. अध्यापनावर याचा परिणाम होत असल्याची चर्चा असल्याने शिक्षकांनी शाळा भरण्याआधी तसेच शाळा सुटल्यानंतर, शनिवार आणि रविवारी जादा काम करावे, अशी सूचना सामलेटी यांनी केल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.