Nashik Traffic : नाशिकच्या 50 चौकांचा चेहरामोहरा बदलणार; 17.94 कोटींचा निधी खर्च होणार, कुंभाआधी वाहतूक कोंडी फुटणार?

Nashik to Upgrade 50 Major Traffic Junctions Before Kumbh Mela : नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने मोठी तयारी सुरू केली आहे. शहरातील ५० प्रमुख चौकांच्या पुनर्रचना व सुशोभीकरणाचा आराखडा तयार केला आहे.
Nashik Traffic
Nashik TrafficSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik to Upgrade 50 Major Traffic Junctions Before Kumbh Mela : वाढत्या वाहतूक कोंडीमुळे होणारा त्रास, अपघात आणि प्रवासासाठी लागणारा अतिरिक्त वेळ कमी करण्याच्या उद्देशाने नाशिक महापालिकेने शहरातील चौकांच्या सुधारणेसाठी आराखडा आखला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाचा भाग म्हणून शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या ५० चौकांचे नूतनीकरण करून त्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामांसाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (NCAP) अंतर्गत १७ कोटी ९४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शहराची व्याप्ती वाढत असून त्यासोबत वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, रस्त्यांवर वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघातांच्या समस्येत भर पडत आहे. वाहतुकीला शिस्त लावून ती अधिक सुरक्षित व सुरळीत करणे, पादचारी आणि सायकलस्वारांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, अपघात रोखणे, सिग्नल व पार्किंग व्यवस्थेत सुधारणा करणे आणि रस्त्यांची वाहतूक क्षमता वाढवणे यावर लक्ष देणे आवश्यक झाले आहे.

दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होतात. या काळात शहरातील वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता लक्षात घेता, दैनंदिन वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने हा चौक सुधार आराखडा तयार केला आहे.

Nashik Traffic
Nashik Kumbh Mela : गर्दी, आग, रासायनिक गळती... कुंभमेळ्यातील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी प्रशासनाची तयारी

चौक सुधार आराखड्याची अंमलबजावणी करताना केवळ चौकांचे सौंदर्य वाढवण्यापुरते काम मर्यादित राहणार नाही, तर वाहतुकीचा शास्त्रीय अभ्यास करून त्यांची नव्याने रचना केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक चौकातील सध्याची वाहतूक स्थिती आणि वाहनांची संख्या मोजली जाणार आहे. त्यानंतर चौकाची संरचना करणे, सिम्युलेशन मॉडेल तयार करणे आणि नकाशा अंतिम करून त्यानुसार रस्त्यांच्या चौकांचे आराखडे तयार करणे, अशा टप्प्यांचा समावेश आहे.

अपघातप्रवण ब्लॅक स्पॉटचे निराकरण करणे हाही या आराखड्याचा महत्त्वाचा भाग आहे. सिंहस्थाच्या दृष्टीने हे काम वेळेत पूर्ण झाले, तर नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागेल. तसेच त्याचा लाभ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसह नाशिकच्या स्थानिक नागरिकांनाही मिळू शकणार आहे.

Nashik Traffic
कुंभमेळ्यातील आखाडा म्हणजे काय? मोजक्या शब्दात समजून घ्या

या चौकांचा होणार विकास

सारडा सर्कल, चांडक सर्कल, आरटीओ कॉर्नर, त्रिमूर्ती चौक, सह्याद्री हॉस्पिटल, साईनाथनगर चौफुली अशोका स्कूल, सिडको मनपसंद स्वीट, ड्रीम कॅस्टल चौक, सैलानी बाबा चौक, पाइपलाइन रोड, आंबेडकर चौक म्हसरुळ गाव, महात्मानगर आरबीसी जंक्स्शन, जुना सायखेडा रोड जेल रोड, माउली लॉन्स, मखमलाबाद नाका, सिम्बायोसिस स्कूल चौक, वॉस्को चौक नाशिक रोड, दक्षिण मुखी हनुमान मंदिर उंटवाडी, शरणपूर रोड, धनलक्ष्मी लॉन्स संभाजीनगर, जयशंकर सर्कल, एक्स्लो पॉइट, आरडी सर्कल, वॉस्को रोड नाशिक रोड, नंदन स्वीट कॉलेज रोड, कलानगर- वडाळा- पाथर्डी मार्ग, भारतनगर चौफुली, डीजीपीनगर-पेट्रोलपंप वडाळा गांव, मार्केट यार्ड- दिंडोरी रोड, बारदान फाटा, जेहान सर्कल, उपनगर, काठे गल्ली सिग्नल, पेठ रोड मार्केट, दत्त चौक नाशिक रोड, रिलायन्स पेट्रोलपंप, कंसारा माता चौक म्हसरुळ, वेद मंदिर, कार्बन नाका, किलबिल स्कूल, ड्रीमसिटी टाकळी रोड, संगम चौक, हिरावाडी सिग्नल, दुर्गा चौक.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.