
Saroj Ahire Theft Case : नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वसामन्य लोकांच्या घरात चोरी नित्याचीच झाली आहे. परंतु आता तर चक्क आमदारांच्याच घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादीच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या नाशिकमधील जेलरोड येथील निवासस्थानी चोरी झाली आहे.
सरोज अहिरे या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार आहेत. नाशिकच्या जेलरोड परिसरात त्यांचे घर आहे. धक्कादायक म्हणजे घरी काम करणाऱ्या मोलकरणीनेच कपाटातून एक लाख रुपये चोरले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मोलकरणीला ताब्यात घेण्यात आले आहे.
डॉ. प्रवीण रामदास वाघ यांनी याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी (दि. 6 जुलै) दुपारी मोलकरीण असलेल्या संगीता केदारे हिने कपाटातून एक लाख रुपयांची रोकड चोरून नेली. या काळात आमदार सरोज अहिरे या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत होत्या. या काळातच मोलकरणीने डाव साधत पैशांची चोरी केली.
तसेच ऑक्टोबर २०२४ ते १५ जुलै २०२५ या काळात घरातून वेळोवेळी पैसे चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संगीता केदार हिला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान नाशिकमध्ये आणखी एक चोरीची घटना घडली आहे. त्यात सुमारे 22 तोळे सोन्याचे, दीड किलो चांदीचे व रोख रक्कम दहा हजार रुपये असा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे. याप्रकरणी वैशाली किशोर मैद (45, रा. गौरी मंगल सोसायटीजवळ, मंगलमूर्तीनगर, कॅनॉल रोड, जेलरोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत दिलेल्या तक्रारीत, गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सहकुटुंब ते त्यांच्या नातेवाइकांकडे जेवणासाठी गेले होते. जेवण करुन रात्री सव्वाअकराच्या दरम्यान ते घरी परतले. तेव्हा घराच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडलेला होता. घरातील कपाटातील वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या होत्या. कपाटातील लॉकरमधून सुमारे साडे एकवीस तोळे सोन्याचे दागिने व दीड किलो चांदीचे दागिने, त्यात गणपती उत्सवाकरिता केलेली आभूषणे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.