

Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची प्रक्रिया सुरू असताना, आठ तालुक्यांचे प्रतिनिधित्व करणारा सदस्य असूनही आपल्याला चर्चेसाठी बोलावण्यात आले नाही. त्यामुळे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि तब्बल 24 मतांनी विजय मिळविला.
या निवडणुकीत सर्वच पक्षांतील लोकांनी मदत केली. आता सर्व पक्षांतील नेत्यांशी आपली आतून दोस्ती सुरू आहे. दिवसा "आपापला पक्ष" आणि सायंकाळी सर्व पक्षांतील लोकांसोबत बसून चर्चा करायची. कुणाला इंजेक्शन, तर कुणाला गोळ्या द्यायच्या आणि सर्वांना एका रांगेत आणून विकासकामे करून घ्यायची, अशी मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी केली.
पारनेर शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच जिल्हा सहकारी बँकेच्या (DCC Bank) संचालकपदी निवडीबद्दल आयोजित सत्कार समारंभात खासदार लंके बोलत होते. गंगारामशेठ बेलकर, रा. या. औटी, मारूती रेपाळे, संजय लाकूडझोडे, दिपक लंके, किरण ठुबे, मोहन रोकडे, नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे, उपनगराध्यक्षा सुप्रिया शिंदे आदी उपस्थित होते. खासदार नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 64 मते घेऊन विजयी झाल्याबद्दल लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना 64 पैठण्यांचे वितरण करण्यात आले.
या तालुक्यातील जनता आपल्यावर प्रेम करते, हे विरोधकही मान्य करतात. अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात विरोधी पक्षनेत्याची भूमिका आपणच बजावत असल्याचे सांगत त्यांनी आपल्या कामाचा आढावा मांडला. 11 हजार शिक्षकांच्या प्रश्नांसाठी जिल्हा परिषदेत दुपारी दोन वाजल्यापासून रात्री साडेआठपर्यंत ठिय्या आंदोलन केले. शिक्षकांनी अनेक पिढ्या घडविण्याचे काम केले असून, त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
पारनेर शहराच्या पाणी योजनेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. योजनेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भातील पत्रावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे शहराचा पाणीप्रश्न लवकरच मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचे खासदार लंके यांनी सांगितले. पारनेर नगरपंचायतीचे नगरसेवक शहरातील पाणीटंचाईच्या काळात टँकरचे नियोजन करीत आहेत. नागरिकांच्या प्रश्नांसाठी काम करणारा लोकप्रतिनिधी असणे आवश्यक आहे, असेही खासदार लंके यांनी म्हटले.
पारनेर शहरात आपण आमदार असताना मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली. मात्र, या कामांचे मार्केटींग करण्यात आपण कमी पडलो. त्यामुळे मागील दोन निवडणुकांमध्ये त्याचा फटका बसला. नगरसेवकांनी आता विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. लोणी रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. भूषण शेलार यांच्या प्रभागातील गाडू मार्ग पूर्ण केला. बापट स्मारकासाठी निधी मंजूर केला असून, विविध प्रभागांतील रस्त्यांची कामे पूर्ण केल्याचे खासदार लंकेंनी सांगितले.
देवीभोयरे ते खडकी रस्त्यासाठी आमदार असताना 350 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद असलेले काम मंजूर केले. गव्हाणवाडी ते बेल्हा रस्त्याचे कामही पूर्णत्वाकडे जात आहे. मतदारसंघात न्यायालय आणि बसस्थानक यांसारखी रखडलेली कामे मार्गी लावली. मात्र, काही जण दुसऱ्यांच्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात, असाही टोला खासदार लंकेंनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.