

Maharashtra politics : कधी कधी आम्ही ठरवून सभागृह तहकूब करतो असा गौप्यस्फोट विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केला आहे. अनेकवेळा विधानसभा व विधान परिषदेत विरोधक आणि सत्ताधारी गदारोळ घालतात आणि मग त्यामुळे सभागृहाचं कामकाज काही काळासाठी तहकूब करावं लागतं. गोऱ्हे यांच्या वक्तव्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात पडद्यामागे आधीपासूनच काहीतरी समझोता असतो का, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.
नाशिकमध्ये सुरु असलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग हे सत्र पार पडले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी या सत्रात सहभाग नोंदवत संवाद साधला.
विश्व मराठी संमेलनातील परिसंवादात विधानभवनात होत असलेला गोंधळ हा कोणत्या व्याकरणाचा अलंकार आहे असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना नीलम गोऱ्हे यांनी हे गुपित फोडले. त्या म्हणाल्या, विरोधक काही प्रश्नावर सभागृहात गोंधळ घालतात. अर्थातच ते जो गोंधळ घालतात त्यामागे त्यांची अपेक्षा असते की त्यांना बोलायला मिळावं. उदाहरणार्थ, एखाद्या मंत्र्यांच्या कार्यालयात पैसे सापडले. अशावेळी विरोधकांना चर्चा करायची असते. पण नियम असा आहे की त्यांनी अगोदर नोटीस द्यावी लागेल आणि मग मंत्र्यावर आरोप करायला हवे.
नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या, ८ दिवसांपूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बंद पडला. पण तो तारांकित प्रश्न होण्यासाठी त्याची मुदत गेलेली असते. त्यामुळे कुठला अलंकार म्हणण्यापेक्षा विरोधी पक्ष हा त्यांचा धर्म किंवा जबाबदारी पाळत असतो. तर सत्ताधारी पक्ष जो आहे तो बुद्धिबळाच्या पटावर जशी दोन प्रकारची व्युहरचना केलेली असते तशी ती असते. त्यातही एक सिक्रेट असे असते की, सकाळच्या वेळीच आम्हाला हे किती वेळ गोंधळ घालणार आहेत हे माहिती असतं. आम्ही हे त्यांना विचारतो सुद्धा की, कितवेळ सभात्याग करणार आहात. काही वेळा पीठासीन अधिकाऱ्याने 15 मिनिटं थांबायचं आणि सुरळीत कामकाज करायचं असं सुद्धा ठरलेलं असतं असं त्या म्हणाल्या.
एखाद्यावेळी विरोधी पक्ष नेता किंवा कुणाकडून तरी अपशब्द वापरला जातो. त्यावेळेला मग कठोर भूमिका घेणं सत्ताधारी पक्षाला भाग असतं. मग सात दिवसांसाठी निलंबन केलं जातं. मग ते खासगीमध्ये येऊन दिलगीरी व्यक्त करतात. मग ते निलंबन सात दिवसांवरुन तीन दिवसांवर केलं जातं. आता हा अपशब्द जो वापरलेला असतो तो मुद्दाम वापरलेला असतो की चुकून वापरला गेलेला असतो हे मात्र तुमच्यासारखे संवादक जे चतुर असतील तर तेच शोधू शकतील.
परंतु लोकसभेत दुर्देवाने काहीवेळा चर्चाच केली जात नाही. विधीमंडळ जे आहे ते चर्चेसाठी आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला बोलण्याची संधी देणं आवश्यक असतं. आम्ही जेव्हा पीठासीन अधिकारी म्हणून तिथे खुर्चीवर बसलेलो असतो तेव्हा आमच्या सभागृहाची रचना अशी आहे की, बाकावर बसलेले जे आमदार आहे ते काय बोलताय हे आम्हाला पूर्ण ऐकु येत असतं. पण त्यांना वाटत असतं की, आम्हाला ऐकु येत नाही. पण ते जे बोलतात ते आम्हाला ऐकु येत असतं. ते म्हणतात की, आता ताई काही बोलायला देतील असं वाटत नाही. ते मी ऐकुन ठेवलेलं असतं मग मी त्यांना दुपारी बोलण्याची संधी देते असं त्यांनी सांगितलं.
एकदा एका आमदाराचे निलंबन हे सभापती सभापती बाहेर पडल्यावर त्या आमदाराने जे काही अंगविक्षेप केले होते त्याच्यामुळे झाले होते. त्यामुळे विधीमंडळातील कामकाज आणि आमदारांवर आमची बारीक नजर असते असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.