NEET Paper Leak Protest: नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर नीट प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात युवकांचे जोरदार आंदोलन सुरूच असून, विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या अपयशाची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीवर युवक अडून बसले आहेत. पेपर फुटीच्या या प्रकरणामुळे देशातील शिक्षण व्यवस्था आणि लाखो युवकांचे भवितव्य संकटात सापडले आहे. संपूर्ण देशभरातून याविरोधात संतापाची लाट उसळली असून नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या समर्थकांनी युवकांच्या न्यायासाठी जोरदार खिंड लढवण्यास सुरुवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मुंबईसह नाशिक जिल्ह्यात आंदोलनाची जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील आंदोलनाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येत असल्याने राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे. काल सिन्नर येथे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या समर्थकांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. आणि इतर परीक्षांच्या पेपर फुटीबाबत केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप करत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सिन्नर येथील आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनालाही जाहीर पाठिंबा देण्यात आला. युवकांच्या या न्याय्य आंदोलनाला केंद्र सरकारने बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटतील असा गंभीर इशारा ठाकरे समर्थकांनी दिला आहे. केंद्र सरकार अतिशय बेदरकारपणे वर्तन करत असून विरोधी पक्षांचा आवाज दाबून हुकूमशाही चालवत आहे, ज्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
नाशिक जिल्ह्यात यापूर्वी नाशिक शहर, मालेगाव आणि मनमाड येथे या प्रश्नावर आंदोलने झाली आहेत. याच साखळीचा एक भाग म्हणून शुक्रवारी (२४ जुलै) सकाळी ११ वाजता निफाड येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष सक्रियपणे सहभागी होत आहेत.
शिक्षण क्षेत्रातील हा घोटाळा आणि युवकांच्या भविष्याशी चाललेला खेळ रोखण्यासाठी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे समर्थक आता आक्रमक झाले असून त्यांनी बाह्या सरसावून रस्त्यावर उतरण्याची पूर्ण तयारी केली आहे. केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात आणि युवकांच्या हक्कांसाठी हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार सर्व विरोधी पक्षांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.