

Nashik TCS Conversion Case : नाशिक येथील TCS कंपनीतील अविवाहित तरुणीवर बलात्कारासह तिच्या सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या SIT पथकाने न्यायालयात एक धक्कादायक पुरावा सादर केला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्यासह इतर संशयितांनी पीडित तरुणीचे आपल्या धर्माप्रमाणे नामांतर करण्यासाठी 5 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच एक वर्षापूर्वी इंटरनेटवर नावाचा शोध घेतल्याची माहिती समोर आली आहे.
संशयित एवढ्यावच थांबले नाही तर त्यांनी पीडित तरुणीचे शैक्षणिक कागदपत्रे जप्त करून घेतली. तिचे बेकायदेशीरपणे नामांतर करुन 'हानिया' असे नाव ठेवले. तिच्या या बदललेल्या नवीन नावाने ९ हजार रुपयांची 'जकात' देखील भरल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यासंदर्भात न्यायालयात एसआयटीने पुरावे दिले असून मंगळवारी (दि. ३० जून) संशयितांच्या जामिनाबाबत न्यायालय अंतिम आदेश देण्याची शक्यता आहे.
संशयित निदा खानसह इतर संशयित दानिश शेख व तौसिफ अत्तार यांचा मुक्काम सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून या तिघांवर गु्न्हा दाखल आहे. नाशिकरोड न्यायालयात 22 जून रोजी या खटल्याची दुसऱ्या सुनावणी घेण्यात आली होती.
या सुनावणीदरम्यान, संशयित निदा खानच्या वकिलांनी तिच्या वैद्यकीय तपासणीचा अर्ज सादर केला. तिच्या वकिलांनी मध्यवर्ती कारागृहातून निदाचा वैद्यकीय अहवाल मागवण्याची विनंती केली. निदा सध्या गर्भवती असून तिच्या शरीरातील लोह व रक्ताचे प्रमाण कमी झाले आहे, तसेच तिला कारागृहात जड कामे करावी लागत असल्याचा युक्तिवाद तिच्या वकिलांनी केला. यापूर्वी तिचा एकदा गर्भपात झाला असल्याने तिला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे वकिलांनी सांगितले. न्यायालयाने हा अर्ज मंजूर करत कारागृह प्रशासनाला निदाच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले आहेत.
निदा खानसह संशयितांच्या जामिनाबाबत १९ जून रोजी झालेल्या सुनावणीत सरकारी व विरोधी पक्षातर्फे जोरदार युक्तिवाद झाला होता. याप्रकरणात तब्बल पंधराशे पानांचे दोषारोपपत्र दाखल आहे. तब्बल तीन तास चाललेल्या युक्तिवादानंतर निकालासाठी २५ जून रोजी अंतिम आदेशासाठी सुनावणी होती. मात्र, न्यायालयाच्या व्यस्ततेमुळे २५ जून रोजी जामिनाबाबत आदेश जारी झाले नव्हते. उद्या मंगळवारी (दि. ३०) पुन्हा आदेशासाठीची सुनावणी आहे. यात जामिनावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यांना जामीन मिळणार की फेटाळण्यात येणार हे उद्याच्या सुनावणीत स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.