Nashik News : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागावाटप कसं होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप अत्यंत आक्रमक असून, शिवसेनेच्या शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला किती जागा मिळणार हे अद्याप समोर आलेले नाही. याबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत असले तरी महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत महायुतीत अद्याप चर्चाच झाली नसल्याचा दावा समीर भुजबळ यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई विभागाचे अध्यक्ष असलेले समीर भुजबळ मागील तीन टर्मपासून नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतात. त्यातील एका निवडणुकीत विजय संपादन करणाऱ्या समीर भुजबळ यांना मागील दोन निवडणुकीत मात्र मोदी लाटेचा फटका बसला. या वेळी ते लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात. मात्र, अद्याप जागावाटपाबाबत चर्चाच सुरू झाली नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट करीत शिवसेना शिंदे गटासह भाजपलाही बॅकफूटवर ढकलले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप कायम असल्याचे भुजबळ यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. या मतदारसंघाची मागणी भाजपकडून पुढे करण्यात आली असून, या जागेवरून लढण्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे समीर भुजबळसुद्धा इच्छुक आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससह शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे तिसऱ्या टर्मसाठी तयारीत आहेत, तर भाजप या जागेवर डोळा ठेवून आहेत.
भाजपच्या सर्व्हेमध्ये हेमंत गोडसे यांचे पिछाडीवर जाणे आणि प्रमुख पक्षाची झालेली फाटाफूट यामुळे गोडसेंच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोडसे शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. ही जागा शिवसेनेची असताना आता भाजपही आग्रही झाला आहे. भाजपचे नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख केदार आहेत, यांच्याकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तशी मागणी केली आहे, तर भाजपचाही नाशिक लोकसभा मतदारसंघातील रस आता लपून राहिलेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवृत्ती अरिंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे इच्छुक असून, त्यादृष्टीने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. वास्तविक मागील तीन टर्मपासून ही जागा समीर भुजबळ लढवत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडे जागा गेल्यास समीर भुजबळ निवडणुकीच्या आखाड्यात उतरू शकतात, ही शक्यता अधिक आहे.
याबाबत भुजबळांनी सांगितले, ‘नाशिक नाही तर महाराष्ट्रातील एकाही जागेबाबत महायुतीत चर्चा झालेली नाही. त्यामुळे उमेदवारीच्या चर्चांबाबत प्रश्नच उद्भवत नाही’. दरम्यान, त्यांनी मागील महिन्यातच निवडणूक लढायची झाल्यास मी नाशिकमधूनच लढणार, असा दावा केला होता. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार आता त्यांनी आपली राजकीय भूमिका बदलली असून, जागावाटपच झाले नसल्याचे स्पष्ट करीत निवडणुकीच्या तयारीत असलेल्या गोडसे यांच्यासह भाजपलाही बॅकफूटवर ढकलले आहे.
(Edited by Amol Sutar)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.