Chhagan Bhujbal Politics : नाशिक लोकसभा जागावाटपाचा तिढा गेल्या काही दिवसापासून सुटत नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. महायुतीच्या जागावाटपाबाबत रोज नव्या अफवा आणि चर्चांना तोंड फुटत आहे. त्यामुळे नाशिकचा मतदारसंघ कोणाचा याबाबत उत्सुकता वाढत आहे. चर्चेच्या फेऱ्या सुरूच असल्याने नाशिकमधील ट्विस्ट काही संपत नसल्याचे चित्र आहे.
नाशिक मतदारसंघात उमेदवार कोण यावरून महायुतीमध्ये गंभीर खलबते सुरू आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र ऐनवेळी त्यांचा पत्ता कट होऊ शकतो, असे बोलले जाते.
नाशिक लोकसभा मतदारसंघात जागावाटप आणि उमेदवार या दोन्ही विषयांवरून महायुतीतील वरिष्ठ नेते एक पाऊलही माघार घेण्यास तयार नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे जागावाटप आणि उमेदवार यात बराच कालापव्यय झाला आहे. गेली तीन आठवडे याबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे रोज नवी चर्चा आणि नवे नाव पुढे येत असल्याने मतदारांमध्ये देखील गोंधळ आहे. (Nashik lok Sabha 2024)
मंगळवारी या संदर्भात प्रमुख इच्छुक असलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपण उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत आहोत, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. त्यामुळे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी नाशिक मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडेच राहील येथून खासदार गोडसे यांना उमेदवारी दिली जाईल, असे स्वतः जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी दिवसभर हेमंत गोडसे यांचे समर्थक खुशीत होते. मात्र सायंकाळपर्यंत त्यांचा हा आनंद पुन्हा एकदा अनिश्चित झाला. सायंकाळी खासदार गोडसे यांचा पत्ता कट होऊ शकतो, अशी चर्चा पसरली.
महात्मा फुले अखिल भारतीय समता परिषदेने मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील प्रमुख ओबीसी नेते म्हणून मंत्री भुजबळ यांनी उमेदवारी करावी. ओबीसींच्या विविध प्रश्नांबाबत संसदेत भुजबळांसारखा आक्रमक नेता हवा आहे. असा ठराव केला होता. त्यानंतर भुजबळ यांनी आपण उमेदवारी घेणार नसल्याचे संकेत दिले. त्याच वेळी त्यांनी प्रबळ इच्छुक खासदार गोडसे यांनी उमेदवारी मिळाल्याची गोड बातमी द्यावी, असे आव्हान वजा वक्तव्य केले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी भुजबळ नसल्यास एक सर्वसमावेशक आणि प्रबळ उमेदवार म्हणून अन्य पर्यायांचा विचार केला पाहिजे. असा हट्ट धरल्याचे कळते. यातूनच मंत्री छगन भुजबळ नसल्यास किमान त्यांच्या कुटुंबातील अन्य कोणी सदस्य अथवा महिला प्रभावी उमेदवार होऊ शकते, असा आग्रह धरल्याचे कळते. या राजकीय विवादातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार गोडसे यांचा पत्ता कट होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात पर्याय म्हणून भुजबळ अथवा त्यांच्या कुटुंबीयातील अन्य सदस्य उमेदवार होऊ शकतो,असे बोलले जात आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागा आणि उमेदवार यातील अनिश्चिततेने आता मतदारही कंटाळले आहेत. तीनही पक्षांच्या पदाधिकारी आणि नेत्यांकडून रोज नवे डावपेच आखले जात आहेत. त्यातूनच रोज नवीन नावे आणि इच्छुक पुढे येत आहेत. यामुळे अंतिम उमेदवारी जाहीर होईपर्यंत काय होईल ? याची शाश्वती आता खुद्द राजकीय पक्षाचे नेतेही देण्यास कचरत आहेत.
(Edited By : Sachin Waghmare)