
Rajabhau Waje : देशात कांद्याचं उत्पादन वाढल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. कांद्याचे दर कोसळायला सुरवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर, नाशिकचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान तसेच वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना दोन स्वतंत्र पत्रं पाठवून कांदा निर्यातीसाठी तातडीने धोरणात्मक पावलं उचलण्याची मागणी केली आहे.
खासदार वाजे यांनी केंद्र सरकारसमोर दोन महत्त्वाच्या मागण्या ठामपणे मांडल्या आहेत. पहिली म्हणजे, निर्यात केलेल्या कांद्यावर सध्या लागू असलेला RoDTEP (Remission of Duties and Taxes on Exported Products) दर वाढवून ५ टक्क्यांपर्यंत करावा.. दुसरी मागणी अशी की, निर्यातदारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी कांद्याच्या निर्यातीसाठी मालवाहतुकीवर ७ टक्के पर्यंत ‘Transport and Marketing Assistance’ (TMA) किंवा तत्सम अनुदान द्यावे
राजाभाऊ वाजे यांनी पत्रात स्पष्ट केलं आहे की, यंदाच्या चांगल्या पावसामुळे देशात कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण भारतात ऑगस्टपासून नवीन कांद्याची लक्षणीय आवक सुरू होईल. यामुळे देशांतर्गत बाजारात कांद्याचा अतिरिक्त पुरवठा होऊन किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका शेतकरी व व्यापार दोघांना बसेल.
त्यांनी नमूद केलं की, सध्या RoDTEP दर केवळ १.९९ टक्के आहे, जो आंतरराष्ट्रीय बाजारात चीन आणि पाकिस्तानसारख्या स्पर्धक देशांच्या तुलनेत खूपच अपुरा ठरतो. या देशांकडून अत्यल्प दरात कांद्याची निर्यात होत असल्याने भारतीय निर्यातदारांना जागतिक स्पर्धेत टिकून राहणं कठीण जात आहे.
वाहनभाड्याचा मुद्दाही त्यांनी पत्रात मांडला आहे. वाजे यांचे म्हणणे आहे की, देशांतर्गत व समुद्रमार्गाने होणाऱ्या वाहतुकीचा खर्च हा लघु व मध्यम निर्यातदारांसाठी प्रमुख अडथळा आहे. त्यामुळे वाहतूक अनुदान दिल्यास त्यांना अधिक संधी निर्माण होईल आणि भारतीय कांद्याला नवे परकीय बाजार मिळू शकेल.
राजाभाऊ वाजेंच्या मते, सध्या नाशिकसह देशातील अनेक बाजारपेठांमध्ये कांद्याचे घाऊक दर प्रतिक्विंटल सरासरी ₹1,280 पर्यंत खाली आले आहेत. हे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत तोकडे असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात मोठ्या प्रमाणावर तोटा येतो आहे.
अतिरिक्त कांद्याच्या पुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी निर्यात हाच एकमेव प्रभावी मार्ग आहे, जो देशांतर्गत बाजारात स्थैर्य निर्माण करू शकतो. त्यामुळे RoDTEP दर वाढवणे आणि वाहतूक अनुदान देणे ही शेतकरी हिताची आणि बाजारासाठी अत्यावश्यक पावले आहेत असं राजाभाऊंनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.