

प्रकाश लोंढे हे आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष असून ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय आहेत. आठवले यांनी गेल्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर असताना लोंढे यांच्यावर राजकीय हेतुने कारवाई झाल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे इतर संशयितांना जामिन मिळाला मात्र, प्रकाश लोंढे यांना नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.
Nashik Prakash Londhe bail : आरपीआय आठवले गटाचे नेते, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे ऊर्फ ‘बॉस’ याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर चार दिवसांपासून तो कारागृहाबाहेर आहे.
त्यानंतर आता त्याचा मुलगा भूषण लोंढे ऊर्फ ‘भाईजी’ यानेही जामिनासाठी नाशिक सत्र न्यायालयात धाव घेतली असून अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर बुधवारी (दि. २१) सुनावणी होणार आहे.
त्र्यंबक रोडवरील आयटीआय सिग्नल परिसरातील औरा बारमध्ये ५ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्री गोळीबार झाला होता. या घटनेत एक युवक जखमी झाला होता. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, भूषण लोंढे यांच्यासह पीएल ग्रुपमधील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोळीबार, प्राणघातक हल्ले, खंडणी यांसह अन्य गुन्ह्यांमध्ये लोंढे टोळीचा सहभाग असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या टोळीविरोधात कारवाई केली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पीएल ग्रुपवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई केली.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, न्यायालयात खटल्याची नियमित सुनावणी सुरू आहे. मकोकांतर्गत भूषण ऊर्फ ‘भाईजी’ लोंढे, शुभम ऊर्फ भुऱ्या राजू पाटील, वेदांत संजय चाळगे, प्रकाश ऊर्फ ‘बॉस’ लोंढे आणि दीपक ऊर्फ ‘नाना’ लोंढे यांच्याविरोधात खटला सुरू आहे.
प्रकाश लोंढे याने टोळीतील प्रत्येक सदस्याला सोन्याच्या २३ अंगठ्या दिल्याचा, तसेच दीपक लोंढे याने खंडणीच्या पैशांचे रूपांतर वैध पैशांत करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख तपासात करण्यात आला होता. या बाबींची दखल घेत नाशिक सत्र न्यायालयाने यापूर्वी त्यांचे जामीन अर्ज फेटाळले होते.
मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने प्रकाश लोंढे याला सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर गेल्या गुरुवारी (दि. १५) तो नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. मात्र, त्यानंतरच्या चार दिवसांत तो नाशिकच्या सातपूर परिसरात आलेला नाही. तो अज्ञातस्थळी रवाना झाल्याची चर्चा आहे. आता भूषण लोंढे यानेही जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू असून, पुढील तारखेला सरकार पक्षाकडून युक्तिवाद होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.