
Pune gangster Nilesh Ghaywal : पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या परदेश पसारावरून राज्यातील राजकारण तापलं असतानाच, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्याबाबत खळबळ उडवून देणारा दावा केला आहे.
आमदार रोहित पवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नीलेश घायवळ याला परदेशात पळवून लावले. पासपोर्ट मिळवून देण्यासाठी पुण्यातील तत्कालीन पोलिस अधीक्षकांची मदत घेतल्याचा खळबळजनक दावा गोपीचंद पडळकर यांनी केला. गोपीचंद पडळकर अहिल्यानगर दौऱ्यावर असताना त्यांनी हा दावा केला आहे.
गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना रोहित पवार यांच्यावर नीलेश घायवळ प्रकरणातील सर्व 'कच्चा-चिठ्ठा' मांडताना जोरदार टीका केली. रोहित पवार अन् नीलेश घायवळ यांच्या संबंधावर भाष्य केले. ते म्हणाले, "रोहित पवार हे धुतल्या तांदळासारखे वागत आहे. परंतु या माणसाच्या भोवती शेकडो गुन्हेगार आहेत. ज्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे, खुनाचे खटले आहेत, अशी शेकडो लोक याच्यासोबत फिरतात. 2019ला रोहित पवार हा नीलेश घायवळच्या मदतीने आमदार झाला आहे." त्यावेळेस नीलेश घायवळ हा काय गुंड नव्हता काय? नीलेश घायवळला गुंड भाजपने केलं का? आता आपण 2025मध्ये आहोत, ह्या सहा वर्षांमध्ये असा काय बदल झाला रोहित पवार यांची पूर्ण भूमिका बदलली, असा प्रश्नही गोपीचंद पडळकर यांनी केला.
'रोहित पवार (Rohit Pawar) यांना अक्कल झिरो आहे, त्यांना महाराष्ट्राची नेता होण्याची घाई लागली आहे. तुझं स्वप्न पूर्ण होणार नाही, तू अजून छोटा आहे, तुझ्या पाठीमागे इतिहास फार काळ आहे, त्या इतिहासातून बाहेर पडणं खूप अवघड आहे, दुसऱ्यावर टीका करणे सोपा आहे,' अशी टोलेबाजी देखील गोपीचंद पडळकर यांनी केली.
'रोहित पवार 2019 मध्ये निवडणुकीला होते, त्यावेळेस अमरावती तुरुंगातून नीलेश घायवळ याला बाहेर काढण्यात आले. घायवळच्या मामाने तसं म्हटले आहे. रोहित पवार ने दिलेल्या तारखेला नीलेश बाहेर आला, हे घायवळच्या मामाचं अत्यंत जबाबदारीचे वाक्य आहे, नीलेश दिलेला पासपोर्ट हा रोहित पवार आणि अनिल देशमुख यांनी दिलेला आहे. मग भाजप विषयी काय बोलता?,' असा प्रश्न देखील गोपीचंद पडळकर यांनी केला.
गोपीचंद पडळकर रोहित पवारांच्या भूमिकेवर चांगलेच संतापले होते. लाजा का वाटत नाही? असा प्रश्न करत, माध्यमांमध्ये येऊन शहाणपणा शिकवता! ही तुमची कृती आहे. नीलेशचा भाऊ सचिन घायवळ हा जामखेडच्या खर्डा गटातून जिल्हा परिषदेसाठी तयारी करतो आहे. त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, घाबरलेत, यामुळे पुणे जिल्ह्यात खोटे-नाटे गुन्हे दाखल करून तत्कालीन पोलीस अधीक्षकांना हाताशी धरून, घायवळविरुद्ध 'मकोका' रोहित पवारांनीच लावलाय, असा गंभीर आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.
'नीलेश घायवळ यांच्या मामानं पासपोर्ट संदर्भात प्रश्न केले आहेत, तो कोणी दिला, यासंदर्भात रोहित पवार यांनी समोर येऊन उत्तर द्यावं. अमरावतीच्या तुरुंगातून कोणी सोडवलं, त्याचे उत्तर देखील द्यावं. का सोडवलं, काय कारण होतं, तुम्ही मदत घेतली का नाही घेतली, हे देखील स्पष्ट करावं, याचा पुरावा म्हणून कोरोना काळातील नीलेश घायवळबरोबरचे व्हिडिओ आहेत. त्यामुळे दुसऱ्याकडे जेव्हा बोट करता त्यावेळी तीन बोट आपल्याकडे असतात, याचा विचार रोहित पवारांनी करणे आवश्यक आहे,' असा देखील चिमटा गोपीचंद पडळकर यांनी घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.