
Mumbai News : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात जलसंपदा विभागातील गोदावरी व कृ्ष्णा खोरे विकास महामंडळ, अशा दुय्यम खात्याचे मंत्रीपद मिळाले. या मंत्रीपदामुळे राधाकृष्ण विखे यांचे भाजपमध्ये डिमोशनची सुरू झाल्याची चर्चा होती. यातच पालकमंत्री नियुक्त्यांच्या तिढ्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याला इतर जिल्ह्यातील मंत्र्याला, पालकमंत्रीपदावर (Guardian Minister) संधी मिळणार, असे देखील सांगितले जात होते.
परंतु या सर्व चर्चा निरर्थक ठरल्या. मंत्री राधाकृष्ण विखे यांना पालकमंत्रीपदावर पुन्हा नियुक्ती मिळाली. मंत्री विखे यांच्या नियुक्तीच्या निमित्ताने, भाजपनं जिल्ह्यातील कारखानदारीतल्या सहकाराच्या राजकारणावर आणि आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीय केल्याचं दिसतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होऊन देखील, महायुतीला लोकसभा निवडणुकीत पराभवाला समोरं जावं लागलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळालं. मविआला यश मिळाल असलं, तरी दुसरीकडे भाजपबरोबरच मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांना सुजय विखे यांचा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पराभवामुळे मोठा धक्का बसला. विधानसभा निवडणुकीत महायुतीनं लोकसभा निवडणुकीतील पराभवावर मात करत मोठा विजय संपादन केला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 जागांपैकी 10 मतदारसंघात महायुतीनं विजय मिळवला. महायुतीमधील पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांचा पेच पाहता, बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्री, पालकमंत्रीपदावर विराजमान होईल, अशी चिन्हं असतानाच दुय्यम मंत्रीपद मिळालेले राधाकृष्ण विखे यांना पुन्हा एकदा पालकमंत्रीपदावर नियुक्ती मिळाली आहे. मंत्री विखे यांच्या नियुक्तीच्या निमित्ताने भाजपनं जिल्ह्यातील कारखानदारीतल्या सहकाराच्या राजकारणावर आणि आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीय केल्याचं दिसतं.
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात अहिल्यानगर जिल्ह्याच्या वाट्याला एकच मंत्रीपद आले. तसं पहिल्यास ज्या खात्याचं मंत्रीपद मिळालं आहे, ते अगदी दुय्यम आहे. राधाकृष्ण विखे यांची जलसंपदा विभागाच्या गोदावरी व कृ्ष्णा खोरे विकास महामंडळाच्या मंत्रीपदावर वर्णी लागली आहे. विखे यांचा विधानसभा मतदारसंघ नगर उत्तरेकडील शिर्डी. मंत्रीपदाच्या वाटणीत नगर दक्षिणेच्या वाट्याला काहीच आलं नाही. ही उणिव भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांना विधानपरिषदेचे सभापतीपद देऊन भरून काढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर उत्तर आणि दक्षिणचा समतोल मंत्री विखे अन् सभापती शिंदे यांच्या रुपानं भरून काढला.
विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचं शिर्डीत महाविजय अधिवेशन झालं. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे होते. केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी,'ग्रामपंचायत से लेकर दिल्ली तक, शत प्रतिशत भाजप', असा नारा दिला आहे. महायुतीमधील भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकप्रकारे स्वबळाचा नारा दिला आहे.
राज्यात महायुतीत भाजपचे आमदार सर्वाधिक असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा वरचष्मा राहील, असेच चित्र असू शकते. त्यानुसार पक्षाच्या सदस्य नोंदणींचा वेग पाहिल्यास यात आमदारांची भूमिका स्थानिक पातळीवर महत्त्वाची राहणार आहे. त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांचा देखील चाचपणी होणार आहे. प्रत्येक आमदार, खासदार, मंत्री आणि नेत्यांना त्यानुसार जुळवाजुळवी करण्याच्या सूचना आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात या निवडणुकांचे नेतृत्व मंत्री विखेंकडे असणार आहे. पालकमंत्रीपदावरील नियुक्तीने त्यावर अधिकच शिक्कामोर्तब केला आहे.
सहकार, शैक्षणिक संस्थांच्या राजकारणातून मंत्री विखे यांची अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड अधिक आहे. यातच विधानसभा निवडणुकीत महायुतीचे प्रमुख म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात काम करताना महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. संगमनेरचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह नगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके यांना त्यांचे होमग्राऊंड पारनेर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत पराभवाची धुळ चारली. नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव झाला. याच नीलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे यांचा पुत्र सुजय विखे यांचा पराभव केला होता.
नेहमीच निवडणुकीच्या अॅक्शनमोडमध्ये असलेल्या भाजपला, ग्राऊंडवर पकड असलेला नेता, मंत्री हवा असतो. मंत्री विखे यांची आतापर्यंतची राजकीय वाटचाल पाहिल्यास, अहिल्यानगरच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघावर त्यांची पकड आहे. यंदाच्या निवडणुकीनंतर मंत्री विखे यांना राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, सत्तेचा पुरेपुर फायदा घेता येणार आहे. त्यांचे पारंपारिक राजकीय विरोधक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात कुठेच नसणार आहे.
थोरातांच्या पराभवामुळे मंत्री विखे यांना विरोध करताना, जड जाणार आहे. त्यामुळे मंत्री विखे यांना पुढील पाच वर्षे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणावर अधिकच पकड मजबूत करण्याची संधी असणार आहे. त्यात पालकमंत्रीपदावर मिळालेल्या नियुक्तीमुळे त्याला अधिकच बळ मिळणार आहे.
असे असले, तरी मंत्री विखेंना महायुतीतील आमदारांना बरोबर घेऊन काम करावं लागणार आहे. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार छोट्या-छोट्या मुद्यांवर आक्रमक होता. त्यांच्याशी समन्वयक साधून घेत, काम आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला समोरं जावं लागणार आहे. महाविकास आघाडीचे विरोधी आमदार बघितल्यास अहिल्यानगर जिल्ह्यात फक्त दोन आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा राजकीय विरोध आक्रमक राहिला आहे.
आमदार रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. मंत्री विखे आणि शरद पवार यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीत विखे अन् पवार यांच्यात आरोप-प्रत्योरापांचं द्वंद राज्यपातळीवर गाजलं. आमदार रोहित पवार यांच्याबरोबर खासदार नीलेश लंके यांच्याशी देखील मंत्री विखेंचा राजकीय संघर्ष असणार आहे. श्रीरामपूर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांचा राजकीय प्रवासाला मंत्री विखे यांच्या तालमीतून सुरू झालेला आहे.
त्यात त्यांच्या आमदारकीची पहिली टर्म आहे. त्यामुळे आमदार ओगले यांच्यापेक्षा अनुभवी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याशी अधिक राजकीय संघर्ष राहू शकतो. तसे पाहिल्यास भाऊसाहेब वाकचौरे आणि मंत्री विखे यांची राजकीय मैत्री संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळे मंत्री विखे यांचा आगामी काळातील पालकमंत्रीपदाचा प्रवास जिल्ह्यात सुसाट, असाच असेल, असे एकंदर चित्र सध्या तरी दिसते.
---------------------------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.