Ahmednagar Crime News : राहुरी न्यायालयातील वकील राजाराम आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव यांची हत्या ही खंडणीसाठी झाल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे वकीलही सुरक्षित नसल्याने नगर जिल्ह्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणातील सराईत गुन्हेगारांसह पाच जणांची नावे समोर आली आहेत. यातील चाैघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सागर साहेबराव खांदे ऊर्फ भैया (रा. येवले आखाडा), शुभम संजित महाडिक (रा. गणपतवाडी शाळेजवळ, मानोरी), किरण नानाभाऊ दुशिंग ऊर्फ दत्तात्रय (वय ३२), हर्षल दत्तात्रय ढोकणे, बबन सुनील मोरे (सर्व रा. उंबरे, ता. राहुरी) अशी सराईतांची नावे आहेत. त्यांनी कट रचून, छळ करून आढाव दाम्पत्याची हत्या केली, तर किरण दुशिंग, सागर खांदे, शुभम महाडिक आणि हर्षल ढोकणे या चौघांना अटक करण्यात आली आहे.
राहुरी (Rahuri) आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी वकील राजाराम आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव यांच्या बेपत्ता तक्रारीची दखल घेत तपास केला. राहुरी न्यायालय परिसरातील सीसीटीव्हीमधील चित्रीकरण पोलिसांनी तपासले. याशिवाय आढाव वकील दाम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकीलपत्र होते, याची माहिती घेतली. यात मानोरी परिसरामध्ये एक संशयित कार फिरत असल्याचे दिसले. या कारचा शोध घेतल्यावर ती रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण दुशिंग वापरत असल्याचे समोर आले. तसेच किरण दुशिंग याच्या वॉरंटबाबतचे प्रकरण आढाव वकील दाम्पत्याकडे होते.
पोलिसांनी किरण दुशिंग याला ताब्यात घेत चौकशी केली. यावर त्याने साथीदारांच्या मदतीने कट करून आढाव वकील दाम्पत्याला खटल्याच्या कामकाजासाठी बोलावून घेतले. यानंतर दुशिंग याने स्वत:च्या गाडीत बसवून घेऊन आढाव दाम्पत्याला त्यांच्याच घरी घेऊन गेले. तेथे दोघांचे हात-पाय बांधून ठेवले. पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. परंतु आढाव दाम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. यातून आरोपींनी आढाव यांचा त्यांच्याच घरामध्ये पाच ते सहा तास छळ केला.
यानंतर आढाव दाम्पत्याला कारमध्ये बसवून त्यांना मानोरी गावाच्या बाहेर घेऊन गेले. रात्रीच्या सुमारास दोघांच्या डोक्यामध्ये प्लास्टिक पिशव्या घालून त्यांना मारण्यात आले. आढाव दाम्पत्याचे मृतदेह उंबरे गावातील स्मशानभूमीजवळ असलेल्या विहिरीमध्ये दगड बांधून टाकून दिले. यानंतर वकील आढाव दाम्पत्याची कार राहुरी न्यायालय परिसरात लावली, अशी माहिती पोलिसांसमोर किरण दुशिंग याने दिली. (Ahmednagar News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तक्रारदार लता राजेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलिस ठाण्यात खुनाचे, अपहरणाच्या गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले आहे. किरण दुशिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध खून, जबरी चोरी, घरफोडी, खंडणी अशा गंभीर स्वरुपाचे १२ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय सागर खांदे हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याविरुद्ध दरोडा, आर्म अॅक्ट असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.