Solapur News : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या पक्ष कार्यालयात एका ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने सोलापुरात एकच खळबळ उडाली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. (Elder Man commits suicide in former MLA Narsayya Adam's office)
अल्लाउद्दीन रहेमान शेख (वय अंदाजे 80, रा. गांधी नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आला आहे. मात्र, शेख यांनी आत्महत्या का केली, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (Solapur Crime)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माजी आमदार नरसय्या आडम यांच्या संकल्पनेतून असंघटित कामगारांसाठी साकारलेल्या कुंभारीच्या रे-नगर येथील तब्बल 15 हजार घरांचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. आडम यांचे कामगारांसाठीच्या या योगदानाबद्दल कौतुक होत असतानाच आज त्यांच्याच कार्यालयात ही दुर्दैवी घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
सोलापूरच्या दत्तगर भागात माजी आमदार नरसय्या आडम यांचे संपर्क कार्यालय आहे. त्या कार्यालयात कामगारांचा कायम राबता असतो. ते कार्यालय नेहमी गजबजलेले असते. सर्वसामान्या माणूस आपल्या समस्या सोडविण्यासाठी या कार्यालयात नेहमी येतात. अशा नेहमीच्या वर्दळीच्या कार्यालयात एका वृद्धाने आत्महत्या का केली असावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पुढे आलेले नाही. जेलरोड पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
दरम्यान, अल्लाउद्दीन शेख हे 1979 पासून आडम मास्तरांकडे येत होते. त्यांना 1985 मध्ये माकपकडून सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीही देण्यात आली होती. मात्र, मधल्या काळात पक्षाचे सदस्यत्व नूतनीकरण न केल्याने त्यांचे सभासदत्व रद्द झाले होते. त्यानंतर त्यांचा माकपशी कोणताच संबंध नव्हता. मात्र, आडम मास्तर यांच्यावरील वैयक्तिक प्रेमापोटी ते भेटायला येत होते.
शेख हे नेहमीप्रमाणे आज सकाळीही आडम यांना भेटले. त्यानंतर आडम मास्तर यांच्या एका नातेवाईकाचे निधन झाल्याने ते कार्यालयातून गेले. कार्यालयात लोक आपापल्या कामात व्यस्त असतात. तेवढ्यात दर्शनी भागातील खोलीचा दरवाजा एका कार्यकर्त्याने काही कामानिमित्त उघडला. त्यावेळी अल्लाउद्दीन शेख यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती माकपचे अनिल वासम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.