Raver Loksabha constituency News: जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. मात्र विरोधकांकडे असलेली उमेदवारांची वाणवा आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी उमेदवारीबाबत पाळलेले मौन यामुळे भाजपच्या इच्छुकांची चलबिचल दिवसेंदिवस वाढत आहे.
जळगाव आणि रावेर हे दोन्ही मतदारसंघ महायुतीतर्फे भारतीय जनता पक्षाकडे आहेत. जळगावला उमेश पाटील तर रावेर येथे रक्षा खडसे हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत. विरोधी पक्षांनी जळगाव मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला तर रावेर लोकसभा मतदारसंघ ( Raver Lok Sabha constituency 2024) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार असे जागावाटप केले आहे. महाविकास आघाडीतर्फे त्यात फारसे बदल होण्याची चिन्हे नाही. अशा स्थितीत खरे तर दोन्ही पक्षांकडून प्रचाराला सुरुवात व्हायला हवी होती. मात्र उमेदवार कोण हे ठरत नसल्याने सगळेच इच्छुक गॅसवर अशी स्थिती आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी यापूर्वी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. प्रारंभी खडसे यांनी देखील उमेदवारी विषयी उत्सुकता दाखविली होती. त्यांनी प्रत्यक्ष जनसंपर्काला देखील सुरुवात केली होती. मात्र गेल्या महिन्याभरात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यांकडून घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे एकनाथ खडसे (Eknath Khadse) सध्या आस्ते कदम या भूमिकेत आहेत. खरे तर श्री खडसे वगळता महाविकास आघाडीकडे रावेर मतदार संघासाठी कोणताही प्रबळ उमेदवार नाही. पर्यायी उमेदवारांचा शोध पक्षाने सुरू ठेवला आहे. मात्र त्यातून ठोस असे नावे पुढे आलेली नाहीत. त्याचा फटका राष्ट्रवादी ऐवजी भाजपला बसण्याची चिन्हे आहेत.
खडसे यांनी सध्या प्रकृतीचे कारण पुढे करत उमेदवारी करण्यास इच्छुक नसल्याचे संकेत दिले आहेत. प्रत्यक्षात खडसे यांचे हे डावपेच भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे राजकारण समजून घेण्यासाठी असल्याचे कार्यकर्ते सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेस कोण उमेदवार देणार, यावर भाजपचा उमेदवार ठरणार आहे. भाजपच्या अंतर्गत राजकीय स्पर्धा आणि गटबाजीत ऐनवेळी उमेदवार बदलण्याचा प्रघात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दोन्ही गटांकडून शेवटपर्यंत ताणले जाण्याची शक्यता बोलली जाते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) गेली दोन टर्म निवडून आल्या आहेत. यंदा त्या हॅट्रिकच्या तयारीत आहेत. मात्र एकनाथ खडसे या नावाभोवती भाजप व त्यांच्या सहकाऱ्यांचा विरोध दिसून येतो. त्यामुळे रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळणार की नाही, हे गुलदस्त्यात आहे.
माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे आणि नुकतेच काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यादेखील उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. परंतु एकनाथ खडसे आपले पत्ते बाहेर काढत नाहीत. त्यामुळे या इच्छुकांना भाजपने गॅसवर ठेवले आहे. थोडक्यात एकनाथ खडसे यांच्या राजकीय डावपेचमुळे भाजपचे सगळेच इच्छुक अस्वस्थ असल्याचे चित्र आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.