Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते एकनाथ खडसे यांच्या कुटुंबाचा राजकीय वारसा खासदार रक्षा खडसे या स्वकर्तृत्वाने गेल्या दहा वर्षांत पुढे नेला आहे. रक्षा खडसे या सोळाव्या लोकसभेतील तरुण खासदारांपैकी एक होत्या. सलग तीन वेळा हा मतदारसंघ भाजपकडे राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मनीष जैन आणि काँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांचा पराभव करून रक्षा खडसे यांनी या रावेर मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाल्या आहेत. गेल्या दोन निवडणुका त्यांनी भाजप-शिवसेना युती म्हणून लढवल्या. त्यांनी संसदेच्या विविध समित्यांवर काम केले आहे.
यंदा त्यांना उमेदवारी मिळाल्यास महायुती अर्थात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासह निवडणुकीला सामोऱ्या जाणार आहेत. त्यात त्यांचा सामना थेट त्यांचे सासरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) एकनाथ खडसे यांच्याशी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने भाजप आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकारण टोकदार झाले आहे.
या मतदारसंघावर लेवा पाटील समाजाचा पगडा आहे. या समाजाने सक्रिय सहभाग घेतल्याने येथील मतदानाचा टक्का वाढला आहे. त्याआधारेच खासदार खडसे यांना सहा लाखांहून अधिक मते मिळाली. त्या भाजपच्या उमेदवार म्हणून 2014 आणि 2019 अशा सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये विजयी झाल्या आहेत. त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांचा लेवा पाटील समाजाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांत समावेश आहे. खासदार रक्षा खडसे यांनी 2010 मध्ये भाजपमधून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यांनी खासदार म्हणून ग्रामपंचायत स्तरापर्यंत आपला संपर्क वाढविला आहे. त्याचा राजकीय लाभ त्यांना झाला आहे.
रक्षा निखील खडसे
13 मे 1987
बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स)
सासरे एकनाथ खडसे (Eknath khadse) हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आहेत. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. ते पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते असून शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये 1995 ते 1999 या कालावधीत ते पाटबंधारे मंत्री होते. 2009 ते 2014 या कालावधीत ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. 2014 मध्ये भाजप, शिवसेनेचे राज्यात सरकार सत्तेत आले. त्यात ते महसूल व कृषिमंत्री होते. खासदार खडसे यांचे वडील कै. जगदीश पटेल (पाटील) हे सामाजिक कार्यात सक्रिय होते. आई श्रीमती प्रियंका जगदीश पटेल (पाटील) या गृहिणी आहेत. पती कै. निखिल एकनाथ खडसे हे भाजपचे पदाधिकारी होते.
खासदार, सामाजिक कार्य
रावेर (जळगाव)
भारतीय जनता पक्ष
खासदार रक्षा खडसे (Raksha khadse)n2010 पासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ग्रामपंचायतीपासून झाली आहे. त्या 14 सप्टेंबर 2010 ते 29 फेब्रुवारी 2012 या कालावधीत कोठळीच्या (ता. मुक्ताईनगर) सरपंच होत्या. 2012 मध्ये भाजपच्या उमेदवारीवर त्या जिल्हा परिषदेच्या सदस्य झाल्या. 2012 ते 2014 या कालावधीत त्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीच्या सभापती होत्या. 2014 मध्ये त्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली. त्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला. 2019 मध्ये त्या याच मतदारसंघातून भाजपकडून दुसऱ्यांदा खासदार झाल्या.
मुक्ताईनगर येथील गुरुनाथ फाउंडेशनच्या त्या अध्यक्ष, मुक्ताईनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव आहेत. मुक्ताई सांस्कृतिक कला मंचच्या उपाध्यक्षही आहेत. या माध्यमातून त्यांनी सातत्याने मतदारसंघात विविध सामाजिक कामे केली आहेत. गरजू नागरिकांना वैद्यकीय तसेच अन्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. संत मुक्ताबाई संस्थांच्या माध्यमातून त्यांनी वारकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले. त्यांच्या संस्थेमार्फत पूजा, कीर्तन आणि वेद पुराण शिक्षणाचे कार्य केले जाते. माहिती तंत्रज्ञान, महिला विकास, ओबीसी कल्याण या समित्यांच्या मार्फत त्यांनी या घटकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न केले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या राष्ट्रीय समितीच्या संचालक मंडळावर त्यांची नियुक्ती झाली. इंटरनॅशनल पार्लमेंटरी फोरम (जिनेव्हा) आणि स्वित्झर्लंड तसेच ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा या समितीवर सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या रावेर मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे डॉ.उल्हास पाटील यांचा दणदणीत पराभव केला.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या दुसऱ्यांदा विजयी झाल्या. भाजपच्या खासदार म्हणून त्यांनी केलेले कामकाज, भाजपचा प्रभाव आणि त्यांचा जनसंपर्क यामुळे त्यांनी ही निवडणूक जिंकली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी काँग्रेसने येथून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यात भाजपच्या खडसे यांना 6 लाख 55 हजार 386 (59.96 टक्के) मते मिळाली. त्यांचे मताधिक्य डॉ.पाटील यांना मिळालेल्या 3 लाख 19 हजा 504 मतांपेक्षाही अधिक होते.
ही रक्षा खडसे यांची दुसरी टर्म होती. त्याला विस्कळीत विरोधी पक्ष, काँग्रेसकडे सक्षम यंत्रणेचा अभाव आणि पंतप्रधान मोदी यांचा राष्ट्रीय स्तरावरील प्रभाव ही प्रमुख कारणे होती. मतदारसंघात त्यांचे सासरे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे दोन मंत्री होते. शिवसेना देखील त्यांच्या सोबत होती. स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध सत्तास्थाने भाजपकडे होती. त्यामुळे प्रबळ यंत्रणा व सक्षम नेते यांचा त्यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा होता. रावेर मतदारसंघ 2009 मध्ये लोकसभा मतदारसंघांची फेररचना झाल्यावर अस्तित्वात आला. तेव्हापासून हरीभाऊ जावळे (2004) आणि त्यानंतर श्रीमती खडसे असा तीन टर्म हा मतदारसंघ भाजपकडेच राहीला आहे. भाजपचा बालेकिल्ला, पुलवामा हल्ल्यामुळे प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेली राजकीय हवा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांचा सहज विजय झाला.
रक्षा खडसे यांनी जिल्हा परिषदेच्या सभपाती म्हणून काम केले असल्यामुळे ग्रामीण भागात त्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क आहे. गावपातळीवर विकासकामांच्या माध्यमातून सर्वाधिक संपर्क असलेल्या महिला व तरुण खासदार अशी त्यांची प्रतिमा होती. कौटुंबिक आणि नातेसंबंधांमुळे रावेर लोकसभा मतदारसंघात असलेल्या जळगाव जिल्ह्यातील गावांतही लेवा पाटील समाजामुळे त्यांचा संपर्क आहे. खासदार खडसे यांनी मतदारसंघात वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबवल्या आहेत. त्यांनी पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री साह्यता योजनेतून सहाशे रुग्णांना मदत मिळवून दिली आहे. रेल्वे विभागातील प्रशिक्षणार्थींना नोकरीत सामावून घ्यावे, यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला. त्यासाठी त्यांनी लोकसभेत लक्षवेधी सूचना मांडून त्यावर चर्चा घडविली. त्यांनी मतदारसंघातील शैक्षणिक अडचणींसाठी दीडशेहून अधिक शाळांना भेटी दिल्या. मतदारसंघातील महिलांसह अन्य समाज घटकांसाठी त्यांनी चार वेळा कवी बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यातून विविध घटकांतील महिलांशी त्यांचा संपर्क निर्माण झाला.
मतदारसंघात मोबाईल कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी विविध प्रयत्न केले. या मतदारसंघात देखील सोशल मीडियाचा विस्तार झालेला आहे. युवक, शिक्षित वर्गावर त्याचा मोठा प्रभाव या मतदारसंघात दिसतो. त्यादृष्टीने खासदार खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शिक्षित वर्गाला जोडून घेतले आहे. त्याद्वारे जनसंपर्क वाढवण्यावर त्यांनी भर दिला. मतदारसंघातील कामकाज, दौरे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच भाजपची ध्येयधोरणे, आपल्या जनसंपर्क दौऱ्यांची माहिती, विकासकामांची प्रसिद्धी त्या आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवरून करतात.
रावेर मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांनी केलेल्या विकासकामांचा वेग मोठा होता. त्यांनी आगामी काळासाठी विविध विकासकामांचे व्हिजन तयार केले आहे. पक्षांतर्गत राजकारणात त्या महत्त्वाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे खडसे कुटुंबीयांत फूट पाडण्यासाठी भाजपने त्यांना स्थानिक पातळीवर हा मुद्दा सकारात्मक वाटल्यास खडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे सर्व आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले आहेत. अशीच स्थिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आहे. त्यामुळे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील अशा तीन मंत्र्यांचा राबता असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडणूक जिंकण्यासाठी प्रचंड परिश्रम करावे लागू शकतात.
रावेर हा केळी उत्पादक शेतकऱ्यांचा मतदारसंघ आहे. यंदा बेमोसमी पाऊस आणि अन्य प्रतिकूल वातावरणामुळे केळी उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यातील अनेक शेतकऱ्यांना पिकविमा मिळू शकलेला नाही. दहा हजार सहाशे शेतकरी केळी विम्याच्या प्रतीक्षेत आहे. याचा फटका भाजपला बसू शकतो. या मतदारसंघातून राष्ट्रीय महामार्ग जात आहे. भाजपच्या अंतर्गत राजकीय स्पर्धेतून आणि एकनाथ खडसे यांना विरोध म्हणून तो रावेरच्या पूर्व विभागातून प्रस्तावित असताना मुक्ताईनगरकडे वळवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यात खासदार रक्षा खडसे यांना विरोध आणि मतदारांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून पक्षांतर्गत राजकारणात त्यांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे गिरीश महाजन आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी लेवा पाटील समाजात प्रचंड असंतोष आहे. भाजप प्रभावी असला तरी या मुद्द्यावरून त्याला राजकीय फटका या मतदारसंघात बसू शकतो. पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता मोठी आहे, परंतु स्थानिक राजकारणातील संघर्षावर भाजपला काही प्रमाणात मर्यादा येऊ शकतात, अशी चर्चा मतदारांत आहे. या नकारात्मक मुद्द्यांमुळे भाजपची आणि त्याच्या उमेदवाराची कोंडी होऊ शकते.
भाजपच्या जळगाव जिल्ह्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे प्रमुख विरोधक आहेत. खडसे यांना भाजपसह शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट अतिशय प्रखरपणे विरोध करत असतो. त्याचा परिणाम भाजपच्या प्रत्येक निर्णयावर दिसून येतो. यामुळे भाजपचे जळगावचे प्रमुख नेते गिरीश महाजन यांनी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी न देण्याचे संकेत दिले आहेत. उमेदवारी कट होण्याची भीती रक्षा खडसे यांनीही व्यक्त केली आहे. या स्थितीत त्यांना उमेदवारी न मिळाल्यास रावेर लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. रक्षा खडसे यांना उमेदवारी न मिळाल्यास खडसे कुटुंबातील एक उमेदवार या मतदारसंघात असेल, असे संकेत आहेत. त्यात रक्षा खडसे की एकनाथ खडसे अशी चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू देखील केला आहे. अशा स्थितीत आगामी निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. त्यात एकनाथ खडसे हे केंद्रस्थानी असतील. त्यांना विरोध करण्यासाठी गिरीश महाजन आपली प्रतिष्ठा पणाला लावतील. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघाची चर्चा येत्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघाएवढीच रंगतदार होऊ शकेल.
राजकीय घडामोडींचे संकेत पाहता महायुतीच्या जागावाटपात तसेच विद्यमान खासदार यामुळे रावेर लोकसभा मतदासंघ भाजपला मिळू शकतो. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ एकनाथ खडसे यांना सोडला जाईल, अशी सध्याची स्थिती आहे. इंडिया आघाडीतीत राजकारण बिनसल्यास काँग्रेस देखील पुन्हा दावा सांगू शकते.
(Edited By : Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.