Ahmednagar News: विखेंच्या राहाता तालुक्यातील कळीचा मुद्दा बनलेल्या 'श्रीगणेश' कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांनी तुफानी टोलेबाजी करत विखेंवर निशाणा साधला. आता यानंतर थोरात-कोल्हेंच्या टीकेला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. "पाहुणे म्हणून येता, पाहुण्या सारखे राहा, भाडेकरू बनू नका, असे म्हणत विखेंनी राजकीय पाहुणे थोरात आणि विवेक कोल्हेंवर नाव न घेता आगपाखड केली.
"स्वत:च्या तालुक्यातील जनतेला पिण्याचे पाणी देवू शकत नाहीत. त्यांनी इकडे येवून विकासाच्या गप्पा मारू नयेत, आम्हांला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. आमच्या तालुक्यातील जनता विकासाला साथ देणारी आहे. इथले प्रपंच उध्वस्त करण्याचे काम करू नका. पाहुणे म्हणून येता पाहुण्यासारखे राहा, भाडेकरी बनण्याचा प्रयत्न करू नका", अशी खोचक टीका विखे पाटील यांनी केली.
राहाता शहरात सुमारे १० कोटींच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा तसेच शहीद जवान अनिल निकाळे यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मुस्लिम, ख्रिश्चन, गोसावी आणि लिंगायत समाजाकरता दफनभूमीची जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल विखे पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना विखेंनी थोरत-कोल्हेंना शेलक्या शब्दात नाव न घेता प्रत्युत्तर दिले.
"शिर्डी येथे कार्यान्वित झालेले अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय ही उत्तर नगर जिल्ह्याकरता मोठी उपलब्धी आहे. या कार्यालयाच्या इमारतीसाठी १०० कोटी रूपयांचा निधी लवकरच मंजूर होईल. विकासाचे प्रकल्प काम करून उभे करावे लागतात, केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाहीत. अनेकांना महसूल मंत्री पदाची संधी मिळाली पण जिल्ह्यासाठी काहीच करणे त्यांना सुचले नाही.
जे स्वत:च्या तालुक्यातील जनतेला पिण्याचे पाणी देवू शकत नाहीत, ते इकडे येवून सल्ले देतात, विकासाच्या गप्पा मारतात. पण आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही. सामाजिक जबाबदारीतून इथे विकास साध्य होत आहे. या विकासाला गालबोट लावण्याचे काम सुरू झाले आहे. पण पाहुणे म्हणून या भाडेकरी बनू नका इथे जागा नाही", असे विखेंनी सुनावले.
"व्यक्तिद्वेश करून तालुक्यातील जनतेचे प्रपंच उध्वस्त करू नका, आमच्याकडे वाळू आणि क्रशरचे माफीयाराज नाही. महसूल विभागात काही कठोर निर्णय केले, यामुळे अनेकांची चिडचिड वाढली", असा टोला विखे पाटील यांनी थोरातांना लगावला.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.