Nagar News : यंदाच्या दिवाळीत सर्वाधित चर्चेत असलेले कुटुंब म्हणजे, पवार कुटुंबिय. कारण सर्वश्रुत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले आणि भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाले. पवार कुटुंबियांची यंदाची दिवाळी कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु परंपरेनुसार पवार कुटुंबियांनी एकत्र येत दिवाळी साजरी केली. पवार कुटुंबियांनी एकत्रित साजरी केलेल्या दिवाळीवर कुटुंबातील सदस्य आमदार रोहित पवार (शरद पवार गट) यांनी मोठे विधान केले आहे.
दिवाळी साजरी करावी, तर पवार कुटुंबियांसारखी, असे दाखले दिले जातात. सर्व कुटुंब दिवाळीच्या दिवशी एकत्र येतेच येते. घरातील ज्येष्ठांपासून ते बालगोपाळांपर्यंत सर्व जण या दिवशी एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात. हेच पवार कुटुंबिय देशाच्या आणि राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी देखील आहे. पवार कुटुंबांची ही राजकारणातील गडद महत्त्वकांक्षी किनार आहे. या कुटुंबातील प्रमुख शरद पवार हे देशाच्या राजकारणातील वलय. त्यांच्या राजकीय वाटचालीचे पडसाद राज्याच्या राजकारणावर सतत पडतात. राज्याचे राजकीय वलय शरद पवारच पूर्ण करतात. अशा शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्याच कुटुंबातील अजित पवार यांनी बंड केले आणि भाजपबरोबर राज्याच्या सत्तेत सहभागी झाले.
अजितदादा यांच्या बंडानंतर ते सत्तेत उपमुख्यमंत्री झाले. आता राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावरून न्यायालयात लढाई सुरू आहे. पवार कुटुंबियांची ही राजकीय लढाई कुठपर्यंत जाईल, हे आगामी काळच सांगेल. अजितदादांच्या या बंडानंतर पवार कुटुंबियांची ही पहिली दिवाळी होती. परंपरेनुसार सर्व पवार कुटुंबिय एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात. त्यामुळे पवार कुटुंबियांची यंदाची दिवाळी कशी होणार, हाच विषय चर्चेच्या केंद्रस्थानी होता. यातच अजितदादांना डेंगी झाला होता. त्यामुळे ते कुटुंबियांबरोबर दिवाळी साजरी करतील का, याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. परंतु या शंकांना अजितदादांनी कुटुंबियांबरोबर दिवाळी साजरी करून पूर्णविराम दिला. अजितदादा आणि त्यांच्या कुटुंबियांनी शरद पवार यांच्या घरी दिवाळी साजरी केली. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी शरद पवार कुटुंबियांनी अजितदादांच्या कुटुबियांबरोबर दिवाळी साजरी केली.
पवार काका-पुतण्याचे नेमके काय चालले आहे, हे पाहून देशातील आणि राज्यातील राजकीय धुरी देखील आवाक झाले आहेत. यातच आमदार रोहित पवार यांनी पवार कुटुंबियांबाबत मोठे विधान केले आहे.
आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे, "अजितदादा आणि त्यांचा परिवार काल शरद पवार यांच्या कुटुंबियांकडे दिवाळी साजरी करण्यासाठी होता. आज शरद पवार आणि त्यांचे कुटुंबिय अजितदादा यांच्या कुटुंबियांकडे दिवाळी साजरी केली. पवार कुटुंबियांमधील ज्येष्ठांना दिवाळी ही एकत्रितपणे साजरी व्हावी, हे नेहमीच आग्रह असतो. शरद पवार यांच्यासह परिवारातील सर्वच ज्येष्ठांना दिवाळी एकत्रित साजरी व्हावी, या इच्छेपुढे परिवारातील सर्व जण एकत्र येतात. ही परंपरा आहे. कुटुंबामध्ये अडचण येणार नाही, याची दक्षता यामागे आहे. राजकीय अचडणी किंवा मतदभेद असतात, त्या राजकीय पद्धतीनेच हाताळाव्यात लागतात". शरद पवार यांच्याच मार्गदर्शनाखाली अजितदादा, सुप्रियाताई आणि परिवारातील इतर काम करतात. अजितदादांनी वेगळा निर्णय घेतला असला, तरी तो त्यांचा व्यक्तिगत राजकीय निर्णय आहे. अजितदादांच्या या निर्णयानंतर आम्ही पवार कुटुंब म्हणूनच भेटतो. अजितदादांचा हा राजकीय निर्णय त्यांचा व्यक्तिगत असल्याचे पवार साहेबांनीच सांगितले आहे. व्यक्तिगत जीवनात आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोत. परंतु राजकीय जीवनात आता विचाराने आम्ही वेगळे आहोत, असेही मोठे विधान आमदार पवार यांनी केले.