Sujay Vikhe Patil And Jayashree Thorat : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या संकल्प सभेत भाजपचे वसंत देशमुख यांनी काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे.
यानंतर संगमनेरमधील (Sangamner) काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ देखील केली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर जयश्री पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महिलांवर एवढ्या खालच्या पातळीवर येऊन वक्तव्य केली जाणार असतील तर त्यांनी राजकारणात कसं यायचं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जयश्री थोरात म्हणाल्या, "जे काही घडलं ते अतिशय वाईट आणि कोणालाही न शोभणारं आहे. महिलांना 50 टक्के आरक्षण द्यायचं म्हणता आणि त्यांच्याबाबत असं बोलत असाल तर महिलांनी राजकारणात कसं यायचं.
मी माझ्या वडिलांसाठी मैदानात होते. माणसांना भेटण्याचं काम करत होते. मी असं काय केलं होतं की, माझ्याबाबतीत एवढं वाईट बोललं गेलं. देशमुखांच्या वयाला न शोभणारं वक्तव्य आहे." तसंच, विरोधक असले तरी त्यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं योग्य नाही. त्यांच्या नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं वक्तव्य करणं न शोभणारं आहे.
माझ्या आजोबानी त्यांना सरळ करण्याचं काम केलं होतं, अशा शब्दात त्यांनी देशमुख यांना सुनावलं. तर अशा माणसाला ते लोक अध्यक्षाचं स्थान देतात," असं म्हणत त्यांनी सुजय विखेंवरही (Sujay Vikhe) हल्लाबोल केला. दरम्यान, सुजय विखेंनी झालेला घटनेचा निषेध केला असल्याचं पत्रकारांनी सांगताच त्या म्हणाल्या, "त्यांनी सुद्धा पातळी सोडून माझ्यावर भाषणं केली आहेत. ते सुद्धा स्वत:ला युवा नेता म्हणतात, तर त्यांनी एक पातळी जपली पाहिजे."
धांदरफळ येथील सुजय विखे पाटील यांच्या सभेत भाषण करताना वसंतराव देशमुख म्हणाले, "आपल्या कन्येला समजवा, नाहीतर आम्ही निवडणुकीच्या काळात मैदानात उतरलो, तर तुमची मुलगी घराबाहेर पडणार नाही. सुजय विखे पाटील, त्यांना ताई म्हणतात.
पण सुजयदादा या ताईचे पराक्रम सगळ्या तालुक्याला माहिती आहेत." वादग्रस्त वक्तव्य करणारे वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) धांदरफळ गावातील रहिवासी आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.