NCP Rift : राष्ट्रवादीत गृहयुद्ध; संजय पवार यांचा डॉ. सतीश पाटलांवर गंभीर आरोप; 'जे पुतण्याचे झाले नाही ते राष्ट्रवादी काँग्रेसचे काय होणार?'

Jalgaon District Bank Election Dispute : जळगाव जिल्हा बँकेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत शीतयुद्ध सुरू झाले असून डॉ. सतीश पाटील आणि संजय पवार आमनेसामने आले आहेत. डॉ. सतीश पाटील यांच्या आरोपांना संजय पवारांनी प्रत्युत्तर दिलं असून त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी केली आहे.
Jalgaon District Bank Election Dispute, NCP Leaders Clash; Satish Patil And Sanjay Pawar
Jalgaon District Bank Election Dispute, NCP Leaders Clash; Satish Patil And Sanjay PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon News : जिल्हा बँकेत पॅनलमध्ये उमेदवारी मिळाल्याने माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी माघार घेतली. याबाबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातच शीतयुद्ध सुरू झाले.

जिल्हा बँकेतून ओबीसी प्रवर्गातून माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांना उमेदवारी हवी होती. मात्र, भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे राजकीय कोंडी झालेल्या डॉ. पाटील यांना माघार घ्यावी लागली होती.

यासंदर्भात डॉ. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. स्वपक्षाच्या नेत्यांनीच घात केला. आपल्याला दगा दिल्याने माघार घ्यावी लागली, असा त्यांचा आरोप होता.

Jalgaon District Bank Election Dispute, NCP Leaders Clash; Satish Patil And Sanjay Pawar
Jalgaon ZP Politics : महायुतीत वर्चस्वाची लढाई तीव्र; भाजप-शिवसेनेत सरळ संघर्षाची चिन्हे, पालकमंत्री गुलाबराव पाटलांची कसोटी!

या आरोपावर बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी पलटवार केला आहे. माजी पालकमंत्री, आमदार आणि बँकेचे अध्यक्ष राहिलेल्या नेत्याला आपल्या अनुभवाचा काय फायदा झाला? डॉ. पाटील यांनी पारोळा मतदारसंघात अमोल पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली नाही. कोणतेही ठराव केले नाहीत, असा गंभीर आरोप पवार यांनी केला.

डॉ. पाटील यांनी मतदारसंघात बँकेसाठी कोणतेही ठराव केलेले नव्हते. कार्यकर्त्यांपासून त्यांचा संबंध तुटलेला आहे. अशा स्थितीत त्यांना ओबीसी प्रवर्गातील आयती जागा हवी होती. ती मिळाली नाही. मात्र, तरीही त्यांना निवडणुकीतून माघार घ्यायला कोणी सांगितले होते, असा पलटवार पवार यांनी केला.

डॉ. सतीश पाटील यांनी पारोळा नगरपालिकेत आपल्या सुनेला उमेदवारी दिली; मात्र त्या पराभूत झाल्या. सख्ख्या पुतण्यालाही ते निवडून आणू शकले नाहीत. चाळीसगाव नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिला होता. त्याच्या विरोधात प्रचार केला. त्यामुळे ते पक्षविरोधी असून, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे. याबाबत मी पक्षश्रेष्ठींकडे कारवाई करण्यासाठी परवानगी मागणार आहे, असेही जिल्हाध्यक्ष असलेले संजय पवार म्हणाले.

Jalgaon District Bank Election Dispute, NCP Leaders Clash; Satish Patil And Sanjay Pawar
Jalgaon Politics : शिंदे शिवसेनेतील नाराज नेत्याची सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत उडी, घड्याळ हाती बांधताच खदखद बाहेर

जळगाव जिल्हा बँकेत महायुतीने पॅनल केले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला समाविष्ट केले आहे. मात्र, जागावाटपात झालेला राजकीय गोंधळ या पक्षातील नेत्यांमध्ये मतभेदाचे कारण बनला आहे. त्यामुळे एकीकडे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा प्रचार, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांत गृहयुद्ध सुरू झाल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.