

Uddhav Thackeray Shiv Sena Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील काही खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या हालचालींनी राजकीय वातावरण तापलं आहे.
या सगळ्या घडामोडींमध्ये शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव विशेष चर्चेत आले असून, त्यावरून आता शिवसेना ठाकरे पक्षातूनही सूचक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
विशेष म्हणजे, स्थानिक शिवसैनिकांचा विरोध असतानाही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर विश्वास दाखवत 2024 लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. त्यानंतर ते खासदार म्हणून निवडून आले. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये त्यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर असल्याची चर्चा सुरू आहे आणि ते सध्या दिल्लीमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे शिवसेनेचे (ShivsenaUBT) नेते संजय राऊत, खासदार अरविंद सावंत आणि सुभाष देसाई यांनी आज सकाळी दिल्ली गाठत संभाव्य राजकीय घडामोडींना प्रत्यक्ष प्रत्युत्तर देण्याची तयारी दाखवली. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी “जे काही व्हायचं आहे, त्याला आम्ही तोंड देऊ,” असा थेट इशारा दिला. या पत्रकार परिषदेला नाशिकचे खासदार राजेभाऊ वाजे देखील उपस्थित होते.
यावेळी संजय राऊत यांनी रविवारी (14 जून) ‘मातोश्री’वर झालेल्या खासदारांच्या बैठकीचा उल्लेख करत एक महत्त्वाचा दावा केला. त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाच खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते आणि सर्वांनी आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही दिली होती.
खासदार राऊत म्हणाले, त्या बैठकीत एका खासदाराने तीन मिनिटांत चार वेळा साईबाबांची शपथ घेतली. माझी पत्नी आजारी आहे, साईबाबांची शपथ… मी तुमच्यासोबत आहे, साईबाबांची शपथ… दोन दिवसांत भेटतो, साईबाबांची शपथ… मरेपर्यंत सोडणार नाही, साईबाबांची शपथ… इतक्या वेळा साईबाबा आठवल्याचं पाहून मलाही आश्चर्य वाटलं.
याशिवाय काही खासदारांनी आई भवानीची, काहींनी आपल्या मुला-मुलींची, तर काहींनी आईची शपथ घेतल्याचा दावाही त्यांनी केला. अशा शपथा घेतल्यानंतर त्या व्यक्तींवर विश्वास ठेवणं अनिवार्य होतं, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी संबंधित खासदाराचे नाव जाहीरपणे घेतले नाही. मात्र पत्रकारांनी हा रोख शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे आहे का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी नाव घेणे टाळले. त्यामुळे राजकीय वर्तुळात संशय अधिक गडद झाला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरू असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’ला रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाने दिल्लीमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली असून, पुढील काही तास महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.