Assembly Election 2024: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुख्यमंत्री शिंदे पक्षाच्या उमेदवारांच्या उमेदवारांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे विधानसभा प्रचारात शिवसेना नेते अधिक आक्रमक झाले आहेत. जळगाव मध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी गद्दार आमदारांना विधानसभेत जाण्यापासून रोखा, असे आवाहन केले.
खासदार राऊत यांची धरणगाव (जळगाव) येथे सभा झाली. यावेळी त्यांनी महायुती सरकार आणि त्यांच्या योजनांचा अक्षरशः पंचनामा केला. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये, या भीतीने महायुती सरकार धास्तावले आहे. त्यामुळेच ते आश्वासनांचा पाऊस पाडत आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिंदे पक्षाचे मंत्री गुलाबराव पाटील उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर आहेत. देवकर यांच्या प्रचारासाठी राऊत यांनी सभा घेतली. यांच्यावर खासदार राऊत यांनी टीका केली.
खासदार राऊत म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक छोट्या छोट्या आणि सामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला. टपरी छाप लोकांना आमदार केले. मात्र हेच टपरी छाप लोक सत्तेत आल्यावर त्यांनी गद्दारी केली. सत्तेसाठी गद्दारी केलेल्या या लोकांना शिवसेना कार्यकर्ते आणि मतदार त्यांची जागा दाखवतील. अशा टपरी आमदारांना येत्या निवडणुकीत विधानसभेत पोहोचू देऊ नका, असे आवाहन राऊत यांनी केले.
मंत्री गुलाबराव पाटील राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे मंत्री आहेत. सत्ता मिळावी म्हणून त्यांनी विचाराशी गद्दारी केली. ते आता थेट शिवसेनाप्रमुखांच्या खऱ्या शिवसेना आणि त्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देऊ लागले आहेत. असे आव्हान देताना त्यांनी किमान आपली पात्रता तरी तपासायला हवी होती. श्री पाटील ते राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री आहेत. मात्र ते धरणगावला पाणी देऊ शकले नाही. येथील नागरिकांची तहान भागवू शकले नाही. ही शोकांतिका आहे धरणगावात त्यांनी कोणताही उद्योग आणला नाही. मात्र सट्टा, पत्त्याचा जुगार आणि वाईन शॉप आणले.
मला मंत्री करा, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पाय धरले होते. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हेच गुलाबराव पाटील निष्ठेच्या गप्पा मारीत असत. पक्षप्रमुखांनी त्यांना मंत्री केले. मात्र जेव्हा पक्षप्रमुख अडचणीत होते, तेव्हा हे महाशय सुरत मार्गे गुवाहाटीला निघून गेले.
मंत्री पाटील प्रत्येक भाषणात शिवसेनेचे उपकार मानत होते. शिवसेनाप्रमुखांनी या टपरीवाल्याला मंत्री केले. या टपरीवाल्याला आमदार केले, असे छाती फुगून सांगत होते. मात्र गद्दारी केल्याने आज ते निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नजरेला नजर देऊ शकत नाही. जळगावची जनता त्यांना विधानसभेत देखील जाऊ देणार नाही, असा दावा खासदार राऊत यांनी केला.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.