Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजन यांनी काल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाबाबत टिप्पणी केली होती. त्याला आज संजय राऊत यांनी उत्तर दिले. यावेळी राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. पैसे व सत्तेच्या जोरावर मराठी माणूस आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवायला निघाले आहेत.
गिरीश महाजन शिवसेना उद्धव ठाकरे हा पक्ष संपवायला निघाले आहेत. पक्ष मराठी माणसांचा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला नाडी बांधायला शिकवली. त्याचे पांग आज भाजप नतदृष्टपणे या पक्षाविरुद्ध कारवाया करून फेडत आहे. ज्यांनी भाजपला बोट धरून महाराष्ट्रात रुजवले त्यावरच भाजप उलटली आहे.
भाजपकडे सत्तेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचा पैसा आला आहे. सोबतीला पोलीस आहेत. आणि पैसा यांच्या मदतीने ते विरोधी पक्षांना खिळखिळे करण्यासाठी काम करीत आहेत. एकनाथ शिंदे आणि भाजप पूर्णपणे विरोधी पक्षांना संपवण्यासाठी सर्वकाही पणाला लावत आहेत. ही मंडळी मंत्रालयातील आपल्या खात्याचा कारभार पाहण्याऐवजी पक्ष फोडाफोडीचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मंत्री महाजन ज्या भाजपचा दावा करतात, तो भाजप पक्ष आज अस्तित्वात आहे का? असा प्रश्न राऊत यांनी केला. भ्रष्ट एकनाथ शिंदे, अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि कितीतरी भ्रष्ट मंडळी त्यांच्या पक्षाबरोबर आहेत. ही भ्रष्ट मंडळी भाजपची मोहीम राबवतात. याच नेत्यांकडे भाजपचे खरे नेतृत्व आहे. त्यामुळे वैचारिक आणि सांस्कृतिक दावा करणाऱ्या भाजप आज शिल्लक आहे का?.
मंत्री महाजन हे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री आहेत. त्यांच्या मंत्रालयात अभिषेक कौल नावाचा दलाल बसतो. अभिषेक कौल मंत्रालयाबाहेर टेंडर आणि फायलींबाबत व्यवहार करीत असतो. त्याने संमती दिल्यावरच गिरीश महाजन फाईलवर सह्या करतात.
आपत्ती व्यवस्थापन हे सामान्य नागरिकांशी संबंधित विभाग आहे. या विभागात मंत्री महाजन भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्व माहिती देण्यास मी तयार आहे. हिम्मत असेल तर त्यांनी चौकशी करून दाखवावी, असे आव्हान राऊत यांनी दिले.
मंत्री महाजन यांच्या भ्रष्टाचारामुळेच त्यांना मंत्रिमंडळात घेण्यास दिल्लीची केंद्रीय समिती तयार नव्हती. महाजन यांनी मंत्री होण्यासाठी काय काय केले, हे आम्हाला बोलण्यास भाग पाडू नये. त्यांनी काय काय करून मंत्री पद मिळविले आहे, हे भाजपच्या नेत्यांना माहिती आहे. त्याचे वाभाडे बातम्यांतून देखील काढण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भ्रष्टाचाराची चौकशी करणार नाहीत असा दावा देखील राऊत यांनी केला. हा भ्रष्टाचार सुरू आहे. मात्र फडणवीस त्याबाबत काहीही करणार नाहीत. त्यांना मुंबई अडानीला द्यायची आहे. त्यात ते व्यस्त आहे. मंत्री महाजन हे त्यांचे निकटवर्तीय आहेत. एक दिवस हेच मंत्री महाजन भाजपला अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाहीत.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.