NCP Sharad Pawar News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी हे पक्षांतर करणार आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हा धक्का मानला जातो.
माजी आमदार संतोष चौधरी हे लोकसभा निवडणुकीत रावेर मतदार संघातून इच्छुक होते. मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. श्रीराम पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यामुळे माजी आमदार चौधरी नाराज होते.
ही नाराजी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रकट झाली आहे. माजी आमदार चौधरी यांनी गुरुवारी मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने श्री चौधरी आता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर देखील माजी आमदार चौधरी शरद पवार यांच्याबरोबरच राहिले होते. गेली पंधरा वर्षे ते पक्षाचे काम करीत होते.
यंदा त्यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अपेक्षित होती. मात्र ती संधी गेल्याने ते नाराज होते. आता मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काही मिळेल, अशी अपेक्षा नाही. त्यामुळे वेगळा निर्णय घेणार आहे. या पक्षाने मला खूप सांभाळून घेतले आणि बरेच काही दिले, असा उपरोधिक टोला देखील त्यांनी लगावला.
आपले सर्व पक्षात आणि त्यांच्या नेत्यांची चांगले संबंध आहेत त्यामुळे कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय विचारपूर्वक घेईल शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेत्यांचीही मी लवकरच भेट घेणार आहे असे माजी आमदार चौधरी यांनी सांगितले
माजी आमदार चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडणार असल्याने या पक्षाला भुसावळमध्ये मोठा धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातही मोठे बदल होतील. भुसावळ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता.
सध्या मात्र येथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्राबल्य आहे. माजी आमदार चौधरी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते भुसावळ मतदारसंघात मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा जोमाने पक्ष बांधणीला वाव मिळेल.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मतदारसंघात जागा वाटपाचा पेच निर्माण होणार आहे. यामुळे अनेक इच्छुक उमेदवार पक्षांतराच्या तयारीत आहेत. त्याचाच भाग म्हणून भुसावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला हा झटका बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.