

Shalarth ID Scam Investigation : शालार्थ आयडी घोटाळ्यात शासनाची तब्बल 160 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. नाशिक पोलीस आयुक्तांनी नेमलेल्या तब्बल दहा एसआयटी पथकांकडून या घोटाळ्याचा तपास सुरू आहे. दोन स्वतंत्र सहायक पोलिस आयुक्तांकडे तपासाची जबाबदारी देण्यात आली असून तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत तपास पथके कार्यरत असून, तपासातून तब्बल 229 शाळांचे दप्तर एसआयटीने आतापर्यंत ताब्यात घेतले आहे. तसेच आतापर्यंत 179 मुख्याध्यापकांची चौकशी करण्यात आली आहे. एसआयटीच्या पथकांनी साध्या वेशात शाळांमध्ये अचानक धाडी टाकल्या. यावेळी अनेक मुख्याध्यापकांनी चौकशी पासून वाचण्यासाठी धावपळ सुरु असून त्यांनी चक्क शाळा सोडून पलायन केल्याचे देखील पाहायला मिळाले.
शैक्षणिक क्षेत्रातील हा एक मोठा आर्थिक गैरव्यवहार असून यात तब्बल 1200 संशयितांची नावे समोर आले आहेत. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या चारही जिल्ह्यांमध्ये सध्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोंदीची चौकशी सुरू आहे. चौकशी केलेल्या 229 पैकी सर्वाधिक 109 शाळा जळगाव जिल्ह्यातील असून नाव आलेल्या शिक्षकाची नेमणूक, शाळेतील हजेरी मस्टर, आवक जावक रजिस्टर अशी विविध दस्तऐवजांची चौकशी करत दप्तर ताब्यात घेण्यात आलं आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्यात उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातील 841 शिक्षकांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीतून अनेक घोळ समोर आले असून काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने वैयक्तिक मान्यता किंवा अधिकृत प्रस्ताव उपलब्ध नसतानाही मागील तारखांचे नियुक्ती आदेश दाखवून शालार्थ आयडी तयार करण्यात आले. या आयडीच्या आधारे वेतन आणि थकबाकीची रक्कम शासनाकडून अदा करण्यात आली आहे. या शिवाय बनावट पटसंख्या दाखवून तुकड्यांना मान्यता घेण्यात आली आहे.
चारही जिल्ह्यातून एसआयटी पथकांना शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी १५० हून अधिक निनावी पत्र मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पत्रामंध्ये कशा पद्धतीने संबंधित शाळेत चुकीचे काम करून पगारापोटी सरकारी अनुदान लाटले जात होते, यात शाळेचे संचालक तसेच मुख्याध्यापकांची असलेली भूमिका याबाबत लिहण्यात आलं आहे. विशेष म्हणजे काही पत्र तर चक्क बनावट नावांचा वापर करुन खासगी कुरीयरने पाठविले आहे. काही पत्रांमधील संपर्क क्रमांकही बनावट आहे. तर काही क्रमांक व माहिती खरी आहे. शाळेतून अंतर्गत वादातून पत्रांचा खच एसआयटीकडे प्राप्त झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.