
Maharashtra politics news : एकीकडे काँग्रेसचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप सुरूच आहेत. तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी दोनजण मला भेटायला आले होते. ही दोन माणसं मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते. 160 जागांवर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते असा दावा शरद पवार यांनी केला आहे.
शरद पवार यांच्या या दाव्यावर आता संगमनेर मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर आणि सचोटीवर शंका घेण्यास पुरेसा वाव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे, जर असे काही एजंटच फिरत असतील तर ईव्हीएमसंदर्भातही प्रश्न निर्माण होतो. शरद पवार यांना भेटलेले दोघे व्यक्ती ईव्हीएम हॅक होऊ शकतं यांचे संकेत देत होते असे आपल्याला वाटते. मतदानावर शंका उपस्थित झाल्यानंतर त्यांचे निरसन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. निवडणूक आयोग भाजपसाठी काम करतोय अशा लोकांच्या मनात शंका असल्याचे थोरात यांनी म्हटलं.
देशात व राज्यात दोन्हीकडे लोकांच्या हितासाठी कार्य करणारे सरकार नसून, मतदानात गैरप्रकार घडवून सत्ता मिळवणे हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा कार्यक्रम झाला आहे, ईव्हीएम आणि खोट्या मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीवर दरोडा घालण्यात आला आहे असा हल्लाबोल थोरात यांनी केला आहे. थोरात म्हणाले, शंका घेण्यासाठी अनेक जागा आहेत. राहुल गांधींनी जे मांडलं त्याचं उत्तर निवडणूक आयोग देऊ शकलं नाही. हरियाणात पुन्हा भाजपची सत्ता येते, हे कसं होऊ शकतं? शंकांचे निरसन करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, मात्र निवडणूक आयोग उत्तर देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील निकालाने आपल्यासह अनेक लोकांना धक्का बसल्याचे थोरात म्हणाले. आपण मतांची पूर्नतपासणी करण्याची मागणी केली होती. त्यासाठी शुल्क भरलं होतं. तेव्हा निवडणूक आयोगाने केवळ यंत्रांची पूर्नतपासणी होईल, मतांची नाही, असं सांगितलं. याचा अर्थ निवडणूक आयोग काहीतरी लपवत आहे, असा आरोप थोरात यांनी केला.
राज्यात अनेक ठिकाणी खोटे मतदान नोंदवले गेल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. आदल्या दिवशीपर्यंत ओळखपत्रांचे वाटप केले जात होते. परंतु, त्यावर कुणी उत्तर देत नाही. राहुल गांधी यांनी दाखविलेली कागदपत्रे केवळ एका मतदारसंघाचे आहेत. ही निवडणूक चोरलेली आहे हे निवडणूक आयोगाला माहिती आहे. राहुल गांधी यांनी जे मांडले, त्याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकत नाही, असा आक्षेप थोरात यांनी बोलून दाखवला.
माजी आमदार अशोक पवार शिरूर मतदारसंघातून पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, काही गावांमध्ये अशा लोकांनी मतदान केलं की ते त्या गावचे रहिवासीच नव्हते. हे लोक कोण आहेत, ते त्या गावांमध्ये का होते, शिर्डी मतदार संघात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदार ओळखपत्र कसे देण्यात आले, असे प्रश्न करीत निवडणुकीआधीही यावर आक्षेप घेण्यात आले होते, परंतु ते सर्व व्यर्थ गेल्याचे थोरात म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.