

Ramrao Wadkute Death : राज्यसभेचे खासदार झालेले भाजप नेते रामराव सखाराम वडकुते (वय 72) यांचे हृदयविकाराने निधन झाले. दिल्लीतील एम्स रूग्णालयात वडकुते यांनी अखेरचा श्वास घेतला.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी भागातून, मराठवाड्यातील धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करायचे. अभ्यासू, अत्यंत प्रगल्भ, निष्कलंक आणि समाजासाठी धडपडणारा राजकारणी रामराव वडकुते यांच्या निधनाने हिंगोली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
भाजपने (BJP) मार्च 2026मध्ये त्यांची महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली होती आणि त्यांनी एप्रिल 2026मध्ये सदस्यत्वाची शपथ घेतली. नानाजी देशमुख यांच्यानंतर हिंगोली जिल्ह्यातून राज्यसभेवर जाणारे ते भाजपचे पहिले नेते होते. राज्यसभेसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची मार्च 2026 मध्ये यादी जाहीर केली होती. रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनाते यांच्याबरोबर रामराव वडकुते यांचेही नाव होते.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) विधान परिषदेवर 2004 ते 2019 दरम्यान आमदार होते. ऑक्टोबर 2019मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पुढे हिंगोली भाजप जिल्हाध्यक्षपद व इतर संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या. अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळाचे माजी अध्यक्षही होते. जून 2026 मध्ये त्यांची नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी शनिवारी रामराव वडकुते यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. यातच रामराव वडकुते यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने भाजपसह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.
खासदार रामराव वडकुते हे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी काल सायंकाळी दिल्लीतील निवासस्थानी चालत होते. तेव्हा त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात ते स्वतः दाखल झाले. त्यांच्यावर डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले. पण मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. मराठवाड्यातील ओबीसी चळवळीतील नेत्यांना खासदार वडकुते यांच्या निधनाने धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.