

Fake Bomb Threat Call Triggers Police Alert in Shirpur : पत्नी घर सोडून गेल्याचा धक्का बसलेल्या एका ट्रकचालकाने मद्याच्या नशेत डायल ११२ या पोलिस हेल्पलाइनवर बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती दिली. या एका कॉलमुळे पोलिसांसह संपूर्ण शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. अनेक तास तपासणी आणि शोधमोहीम राबवल्यानंतर बॉम्ब असल्याची माहिती अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.
शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथील सीमा तपासणी नाक्यावर गुरुवारी (ता. २५) सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. दशरथ नावाच्या ट्रकचालकाने डायल ११२ वर फोन करून काही अनोळखी संशयितांनी नाक्यावर बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच ही माहिती मिळाल्याने यंत्रणा तातडीने सतर्क झाली.
सांगवी (ता. शिरपूर) पोलिसांच्या मदतीने बॉम्बशोधक पथकाने सीमा तपासणी नाक्याचा परिसर तपासला. खबरदारी म्हणून या मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली. तसेच नाक्यावरून जाणाऱ्या वाहनांचीही बारकाईने तपासणी करण्यात आली. मात्र, संशयास्पद वस्तू आढळून येत नव्हती.
दुसरीकडे, ज्या ट्रकचालकाने बॉम्बची माहिती दिली होती, त्याच्याशी संपर्क साधण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. सांगवी पोलिसांनी त्याच्या मोबाईलवर ५० हून अधिक वेळा संपर्क केला; मात्र तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढली होती. अखेर दशरथने फोन स्वीकारल्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधला आणि विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तो काहीतरीच बडबड करत असल्याने तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्याने व्यवस्थित प्रतिसाद देण्यास सुरुवात केली.
दशरथ हा राजस्थानचा रहिवासी असून, ट्रक घेऊन महाराष्ट्राच्या दिशेने येत असताना त्याला पत्नी घर सोडून गेल्याचा निरोप मिळाला होता. या घटनेमुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला. या तणावातून त्याने मद्यप्राशन केले. त्यानंतर नशेतच डायल ११२ वर फोन करून बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती दिली.
या प्रकाराची सांगवी पोलिसांनी नोंद केली आहे. दशरथच्या वैयक्तिक कौटुंबिक समस्येमुळे पोलिसांसह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा वेठीस धरली गेली. सीमा तपासणी नाक्यावरील वाहतूकही बराच वेळ विस्कळित झाली. मात्र, परिस्थिती हाताळताना पोलिसांनी दाखवलेली तत्परता, आपत्ती व्यवस्थापन आणि समयसूचकतेचे उपस्थितांनी कौतुक केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.