

Shrigonda Municipal Council : ‘मी सांगूनही दुसऱ्याची क्रेन का लावली?’ असा सवाल करत श्रीगोंदा नगरपरिषदेच्या एका नगरसेविकेच्या पतीने ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर नगरपरिषद कार्यालयात जाऊन दोन अभियंत्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचा गंभीर प्रकार घडल्याने नगरपरिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदा (Shrigonda) नगरपालिका सध्या भाजपच्या ताब्यात आहे. या प्रकरणात नगरसेविका अश्विनी काळे यांचे पती प्रवीण काळे यांच्यावर ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यासह नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, प्रवीण काळे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
नगरपरिषदेने (Municipal) झाडांची तोडणी करण्यासाठी एका ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. संबंधित ठेकेदाराचा कर्मचारी सचिन इंगळे हा क्रेनच्या साहाय्याने नगरपरिषदेच्या परिसरात झाड तोडण्याचे काम करीत होता. यावेळी प्रवीण काळे तेथे आले. ‘मी सांगूनही तुम्ही ही क्रेन का लावली?’ असा सवाल करत प्रवीण काळे यांनी सचिन इंगळे यांच्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. या वेळी तेथे काही नगरसेवक आणि अन्य नागरिक उपस्थित असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर प्रवीण काळे नगरपरिषद कार्यालयात गेले आणि तेथेही गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता सागर पडोळकर आणि विद्युत अभियंता आकाश सानप यांना शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा आरोप अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. या प्रकारानंतर नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ कामबंद आंदोलनाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घडलेला प्रकार चुकीचा असून याबाबत नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित प्रकाराबाबत माफी मागितली नाही, तर नगरसेविका अश्विनी काळे यांच्या अपात्रतेबाबतचा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येईल, असा इशाराही मुख्याधिकारी भगत यांनी दिला आहे.
दरम्यान, प्रवीण काळे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. आपण कोणालाही मारहाण केलेली नाही, शिवीगाळ किंवा दमदाटीही केली नसल्याचा त्यांचा दावा आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. चौकशीत आपण दोषी आढळल्यास शिक्षा भोगण्यास तयार असल्याचेही प्रवीण काळे यांनी म्हटले आहे. आता या प्रकरणात नगरपरिषद प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते? नगरसेविकेच्या अपात्रतेचा प्रस्ताव प्रत्यक्षात पुढे पाठविला जातो का? याकडे श्रीगोंद्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.