

Nashik Kumbmela : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण नुकतेच सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. परंतु नुकत्याच अनावरण केलेल्या सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे स्वरुप व त्यातील प्रतिकांवरुन वादाचे पडघम वाजू लागले आहेत.
सिंहस्थ- कुंभमेळ्याच्या बोधचिन्हात नाशिकमधील सिंहस्थाशी संबधित प्रतीके नसल्याचा निषेध नाशिक येथे शाही स्नान करणाऱ्या रामानंदी संप्रादयाच्या आखाड्यांच्या महंताकडून होत आहे. मंहत भक्तीचरण दास यांनी या बोधचिन्हामध्ये श्रीरामाचे धनुष्यबाण, शंख, चक्र अथवा सर्वसमावेशक ओम यापैकी काही तरी समावेशीत असायला हवे होते, असे मत व्यक्त केले आहे.
सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी भरतो, त्यामुळे त्र्यंबक येथील प्रतिकांप्रमाणेच नाशिकच्या प्रतिकांचाही समावेश होणे अपेक्षित होते अशी भावना व्यक्त करतानाच या बोधचिन्हात बदल करण्याची मागणी नाशिक येथील आखाड्यांशी संबधित महंतांकडून होत आहे.
शैव-वैष्णव वाद पेटवण्याचा प्रयत्न ?
कुंभमेळ्यामंध्ये १३ आखाडे सहभागी होत असतात. त्यात सन्यांशांचे सहा, बैराग्यांचे तीन, ब्रम्हचारी एक, उदासी दोन व निर्मळ एक असे आखाडे आहेत. देशात चार ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्यापैकी नाशिक-त्र्यंबक वगळता उर्वरित तीन ठिकाणी हे सर्व तेरा आखाडे एकाच ठिकाणी शाहीस्नान करतात. त्र्यंबकेश्वर येथेही १८७० पूर्वी हे सर्व आखाडे एकाच ठिकाणी शाहीस्नान करत होते.
मात्र, त्यावेळी संन्याशी व बैरागी या आखांड्यामध्ये झालेल्या वादातून जवळपास २२०० साधू मारले गेल्याचा उल्लेख काळाराम मंदिरातील शिलालेखावर आहे. यावरुन त्यानंतर बैरागी किंवा वैष्णव संप्रदायाचे तीन आखाडे त्र्यंबकेश्वर येथे शाहीस्नान करत नाही. तेव्हापासून त्यांनी स्वतंत्रपणे नाशिक येथे रामकुंडावर शाहीस्नान करण्यास सुरुवात केली. मात्र, प्रत्येक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळेस कोणते न कोणते कारण काढून शैव व वैष्णव यांच्यात वाद निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असतात. यावेळीही सिंहस्थाच्या बोधचिन्हावरुन असाच कथित शैव -वैष्णव वाद उभा करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे वाटत आहे.
कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले असून या बोधचिन्हात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील दोन्ही ठिकाणाच्या प्रतिकांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.