राजेंद्र त्रिमुखे
Ahmednagar Politics News: राज्यात २०१९ नंतर २०२२ आणि २०२३ या वर्षात अनेक राजकीय उलथापालथ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून शिवसेना, राष्ट्रवादीचे बरेच विद्यमान आमदार-खासदार भाजपसोबत सहकारी पक्ष म्हणून गेले आहेत. मात्र, अनेक माजी आमदार-खासदारांसाठी सद्य राजकीय परिस्थिती ही एक इष्टापत्ती ठरत आहे. त्यातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने आगामी लोकसभेसाठी शिर्डीतून उमेदवार शोधला असल्याचे पुढे येत आहे. (Thackeray group became the candidate for Shirdi Lok Sabha constituency)
माजी खासदार भाऊसाहेब वाक्चौरे (Bhausaheb Waghchaure) यांनी नुकतीच मुंबईत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. भाजपला रामराम करत ते लवकर हाती पुन्हा एकदा शिवबंधन बांधणार आहेत. मूळचे अकोले तालुक्यातील आणि नगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अधिकारी, त्यानंतर शिर्डी (Shirdi) संस्थानचे मुख्य प्रशासकीय अधिकारी राहिलेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी २००९ मध्ये काँग्रेस आघाडीचे रामदास आठवले यांना पराभूत केले. शिवसेनेकडून (Shivsena) ते खासदार म्हणून निवडून आले होते.
दरम्यान, वाक्चौरे यांनी २०१४ मध्ये अचानक काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र, मोदी लाटेत शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे शिर्डीचे खासदार झाले. लोकसभेला पराभूत झालेले वाकचौरे यांनी भाजपत प्रवेश करत श्रीरामपूरमधून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र त्यातही ते पराभूत झाले. त्यानंतर काहीसे राजकीय अज्ञातवासात असलेले वाकचौरे बदलत्या राजकीय समीकरणात पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची गेल्याच आठवड्यात भेट घेतली आहे.
वाकचौरे हे लवकरच हाती शिवबंधन बांधणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यांच्या उमेदवारीला बाळासाहेब थोरात आणि गणेश कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने नाराज असलेला भाजपचा एक गट यांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे. या राजकीय परिस्थितीत भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावाला जिल्ह्यातील नेत्यांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीचा आणि लवकरच हातात शिवबंधन बांधणार असल्याच्या घडामोडींच्या चर्चेला वाकचौरे यांनीही दुजोरा दिला आहे.
शिर्डीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून बबनराव घोलप इच्छुक असल्याचे बोलले जाते. तसेच, रामदास आठवले यांनी भाजप आघाडीकडून शिर्डीतून लढण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. त्यातच शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यामन खासदार सदाशिव लोखंडे बीआरएसच्या नेत्यांना भेटत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची घोलप यांच्याऐवजी वाकचौरे यांना जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता अनुकूलता असल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.