

Maharashtra companies closed : एकीकडे महाराष्ट्र हे देशाचे औद्योगिक इंजिन असल्याचा दावा केला जातो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग येत असल्याचा गवगवा राज्य सरकार नेहमी करत असते. मात्र, प्रत्यक्षात केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या अधिकृत आकडेवारीने या दाव्यालाच मोठा धक्का दिला आहे.
गेल्या पाच वर्षांत राज्यातील तब्बल 36,211 खासगी कंपन्या लिक्विडेट, विसर्जित किंवा कंपनी रजिस्टरमधून स्ट्राइक ऑफ झाल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात तब्बल 840 कंपन्या बंद झाल्या, तर पुण्यात 6,433, ठाण्यात 4,704, मुंबई शहरात तब्बल 12,009 आणि नागपुरात 1,478 कंपन्यांवर टाळे लागले आहे. संभाजीनगरमध्येही 654 कंपन्या बंद झाल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून ही आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे, कंपन्या बंद झाल्यानंतर किती कामगार बेरोजगार झाले, कितींची भविष्य निर्वाह निधी, उपदान आणि थकीत वेतनाची देणी आहेत, याची एकत्रित माहितीच केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे उपलब्ध नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योग बंद होण्याची वास्तविक व्याप्ती किती मोठी आहे आणि त्याचा थेट फटका किती कुटुंबांना बसला आहे, हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
मी तपासून सांगतो....
दरम्यान, केंद्र सरकारच्या या धक्कादायक आकडेवारीवरुन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने 36 हजाराहून अधिक कंपन्या बंद झाल्याचे सांगितले असले तरी महाराष्ट्राची स्थिती मला बघावी लागणार आहे. मी केंद्र सरकारला चुकीचे ठरवत नाही, पण मला याची तपासणी करावी लागेल, असं उद्योगमंत्री सामंत यांनी म्हटलं आहे. राज्यातील 36 हजारांवर कंपन्या बंद झाल्याची माझ्याकडे कुठलीही माहिती नाही. वस्तुस्थिती पडताळण्यासाठी एक दिवस द्या, मी तपासून सांगतो असही सामंत यांनी म्हटलं आहे.
नाशिकमधील ८४० कंपन्यांचे बंद होणे हे अत्यंत गंभीर
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील ३६ हजारांहून अधिक खासगी कंपन्या बंद झाल्याची अधिकृत आकडेवारी संसदेत समोर आली आहे. त्यात नाशिकमधील ८४० कंपन्या बंद झाल्या आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे.
उद्योग बंद होण्यामागची कारणे काय, त्यातून किती रोजगार गेले आणि प्रभावित कामगारांचे काय झाले, याचा सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे. केवळ नवीन उद्योग आणण्याच्या घोषणा नकोत; विद्यमान उद्योग टिकले पाहिजेत, रोजगार वाचला पाहिजे आणि उद्योग बंद पडल्यास कामगारांच्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.