Jalgaon : राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते जळगावात रविवारी (ता.१०) होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व सरदार वल्लभभाई पटेल पुतळा अनावरणास शासनाने स्थगिती दिली असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची दिनांक व वेळ मागण्यात आली आहे. त्यामुळे त्या दरम्यान कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये असे पत्र शासनाच्या उपसचिवांनी महापालिकेस पाठविल्यामुळे पेच निर्माण झाला आहे.
जळगाव(Jalgaon) महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाची सत्ता आहे, तर भाजप व शिंदे गट विरोधक आहेत. आता या संदर्भात तोडगा काढण्यासाठी सत्ताधारी, विरोधी नगरसेवक व सामाजिक संघटनांची जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे बैठक सुरू आहे.
जळगाव शहरात महापालिकेतर्फे पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूतळा उभारण्यात आला आहे. तर महापालिका प्रशासकीय इमारतीच्या आवारात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आला आहे. महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या महापौर जयश्री महाजन आहेत. तर उपमहापौर कुलभूषण पाटील हे ठाकरे गटाचेच आहेत.
पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी त्यांनी पुतळ्याच्या अनावरणास आपण येवू अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार उपमहापौर पाटील यांनी अवघ्या तीन महिन्यात पुतळा उभारणीचे काम महापालिकेच्या माध्यमातून पूर्ण केले. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ १७ सप्टेबरला पूर्ण होत आहे. (BJP- Shinde Group)
उध्दव ठाकरे यांच्या हस्ते अनावरणाचा शब्द दिल्यामुळे रविवार (ता.१०)रोजी त्यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्याचा ठरविण्यात आले. शासकीय नियमानुसार हा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे महापालिकेच्या इमारतीच्या आवारात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळाही महापालिकेतर्फे उभारण्यात आला आहे. त्यामुळे त्या पुतळ्याचे अनावरणही उध्दव ठाकरे यांच्या हस्ते दहा सप्टेबरला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या महासभेत त्याला मंजुरी घेण्यात आली, शासकीय प्रोटोकॉलनुसार करण्यासही मंजूरी देण्यात आली. त्यानुसार महापौर, उपमहापौर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना नियमानुसार निमंत्रण देवून त्यांची तारीखही घेण्यात आली,त्यांनी दहा सप्टेबर रोजी जळगावात दोन्ही पुतळा अनावरणास येण्याचे मान्य केले.त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा दौराही प्राप्त झाला आहे. अशा परिस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी ७ सप्टेबरला महापालिका आयुक्तांना निवेदन देवून दोन्ही पुतळ्याचे अनावरण शासकीय प्रोटोकॉलनुसार व्हावे अशी मागणी केली. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यंत्री तसेच जिल्ह्यातील तीनही मंत्री यांची तारीख व वेळ घ्यावी, त्या तारखेलाच लोकार्पण, उद्घाटन सोहळा शासकीय प्रोटॉकॉलनुसार आयोजन करावे अशी मागणी केली.
शिवसेना शिंदे गटाचे गटनेते दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, प्रतिभा देशमुख, रेश्मा काळे, चेतन सनकत,रेखा पाटील यांच्या त्यावर स्वाक्षऱ्या आहेत. त्यांच्या पत्रानुसार महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी शासनाकडे पत्र पाठवून मार्गदर्शन मागविले होते.
शासनाने कार्यक्रमास दिली स्थगिती
महापालिकेच्या आयुक्तांचे पत्र शासनाला प्राप्त होताच. शासनातर्फे कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत राज्याचे उपसचिव शंकर जाधव यांनी आज तातडीने महापालिकेस पत्र पाठविले असून मुख्यमंत्री,उपमुख्यंमत्री यांची दोन्ही पुतळा अनावरणासाठी वेळ व तारीख घेण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्री(Chief Minister) कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.
सबब त्या दरम्यानच्या कालावधीत सदर पुतळ्यांच्या अनावारणाबाबत इतर कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये असे आपणास कळविण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे शासनाच्या या पत्रानुसार आता दहा सप्टेबर रोजी उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या दोन्ही पुतळ्याच्या अनावरणास स्थगिती देण्यात आली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.