Ahmednagar News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेचे नगर जिल्ह्यातील नेते विक्रम राठोड यांनी नगर महापालिकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे. नगर शहरात मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवावरून विक्रम राठोड महापालिकेच्या कारभाराविरोधात आक्रमक झाले.
मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी महापालिकेने नेमलेली पीपल फॉर अॅनिमल ही कंपनी बोगस असून या कंपनीमागे राष्ट्रवादीचा पदाधिकारी 'शॅडो पार्टनर' म्हणून कार्यरत आहे, असा गंभीर आरोप विक्रम राठोड यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, महापालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता आहे. विक्रम राठोड यांनी मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणात नगरकरांचीच फसवणूक होत आहे. यात महापालिका प्रशासन देखील सहभागी आहे, असा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांचा व्हिडिओ समाज माध्यांवर व्हायरल होत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विक्रम राठोड म्हणाले, "महापालिका म्हणजे चोरांचा बाजार आहे. अधिकारी भ्रष्ट झाले असून, त्यांच्यावर अंकुश नाही. यामागे आयुक्त आहेत. नगर शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी नेमलेली पीपल फॉर अॅनिमल ही कंपनी बोगस आहे. पिंपरी, चिंचवड, मुंबईतील कुत्र्यांचे छायाचित्र दाखवून बोगस बिल पास केली जात आहेत".
"या कंपनीला एका प्रमाणपत्रावर काम मिळते. कंपनी या कामासाठी एकादा स्थानिक नेता पकडते. त्यावर पुढचे काम सोपवते आणि मोकळी होते. नगरमध्ये या कंपनीबरोबर राष्ट्रवादीचा पदाधिकारी 'शॅडो पार्टनर' म्हणून काम पाहत आहे. वेळप्रसंगी या सर्व कामाची पोलखोल पण आपण करू", असा इशारा विक्रम राठोड यांनी दिला.
विक्रम राठोड यांनी पुढे म्हटले की,"नगर शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. पादचारी, दुचाकी आणि मोटरगाडीच्या मागे ही कुत्रे पळतात. यातून ते हल्ला करतात. लहान मुलांवर देखील मोकाट कुत्र्यांचे हल्ले वाढवले आहेत. निर्बिजीकरण दाखवून बोगस बिले काढली जात आहेत.
विशेष म्हणजे ही बिले देखील मंजूर होत आहे. या प्रकरणात खूप मोठा भ्रष्टाचार आहे. हा भ्रष्टाचार सर्वांना माहित आहे. परंतु सर्व जण डोळे बंद करून बसले आहेत. या कंपनीचे काम बोगस असून, त्यांनी नेमलेला डॉक्टर देखील बोगस आहेत", असा आरोपही विक्रम राठोड यांनी केला.
या प्रकरणावर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी देखील मत मांडले आहे. "नगर शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरणच होत नाही. रात्री नऊ आणि दहा वाजल्यानंतर दुचाकीवर नगर शहराच्या रस्त्यांनी फिरता येत नाही. कुत्रे मागे लागतात.
या बोगस निर्बिजीकरणाच्या माध्यमातून नगरकरांच्या कोट्यवधी पैशांची लूट झाली आहे. सर्व प्रकाराची चौकशी होईपर्यंत बिल थांबवले पाहिजे. परंतु यात महापालिकेचे अधिकारी देखील सहभागी आहेत", असा आरोप बाळासाहेब बोराटे यांनी केला.
Edited by : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.